
सामना ऑनलाईन, पुणे
डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेल्या कळसकरने मुंबईतील खाडीमध्ये फेकलेल्या पिस्तुलातून डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याची शक्यता सीबीआयने न्यायालयात व्यक्त केली होती. याप्रकरणी यापूर्वी अटक केलेल्या सचिन अंदुरेच्या मेहुण्याच्या मित्राकडून जप्त केलेले पिस्तूलदेखील दाभोलकर हत्येमध्ये वापरल्याचा अंदाज सीबीआयने व्यक्त केला होता. तसेच हत्याप्रकरणी सर्वप्रथम अटक केलेल्या मनीष नागोरी, खंडेलवाल याच्याकडून एटीएसने जप्त केलेल्या पिस्तुलातून डॉ. दाभोलकर याच्यावर गोळ्या झाडल्याचे तपास यंत्रणेचे त्यावेळी म्हणणे होते. त्यामुळे गुन्ह्यावेळी नेमके कोणते पिस्तूल वापरले याबाबत घोळ कायम आहे.
डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी एटीएसने मनीष नागोरी आणि खंडेलवाल यांच्याकडून पिस्तूल जप्त केले होते. ते पिस्तूल डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये वापरल्याचे त्यावेळी एटीएसचे म्हणणे होते. त्यानंतर २०१५ साली गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी डॉ. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमध्ये एकाच पिस्तुलाचा वापर केला गेल्याची थिअरी तपास यंत्रणेने मांडली. मात्र, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर काही दिवसांच्या आतच पिस्तूल जप्त करण्यात आले होते. मग, पोलिसांच्या ताब्यात असताना त्याच पिस्तुलाचा वापर पानसरे यांच्या हत्येमध्ये कसा केला जाऊ शकतो? असा सवाल निर्माण झाला होता.
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांनी गुन्ह्यातील पिस्तूल हे डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेल्या सचिन अंदुरे याच्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचा दावा सीबीआयमार्फत करण्यात आला होता. अंदुरे याच्या मेहुण्याच्या मित्राकडून जप्त केलेले पिस्तूल तेच असल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला होता. दरम्यान, हे पिस्तूल तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले. तपासणीनंतर या पिस्तुलाचा वापर डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये केल्याचे सांगण्यात आले.
नालासोपारा स्फोटकप्रकरणी अटक करण्यात आलेला शरद कळसकर हादेखील डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमधील दुसरा शूटर असल्याचे सांगून सीबीआयने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये नवीन मुद्दा न्यायालयात मांडण्यात आला. कळसकर याच्याकडे चार पिस्तुले होती. ती तोडून त्याने मुंबईतील एका खाडीमध्ये फेवूâन दिली. मात्र, रात्री ही पिस्तुले खाडीत फेकल्यामुळे नेमकी जागा कळसकरला आठवत नसल्याचा दावा तपास यंत्रणेमार्फत न्यायालयात करण्यात आला. त्यामुळे डॉ. दाभोलकर यांच्या हत्येवेळी नेमक्या कोणत्या पिस्तुलाचा वापर केला गेला? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
सीबीआयने डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेला वीरेंद्र तावडे हा मास्टर माइंड असल्याचे म्हटले होते, तसेच डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारे दोघे हे सारंग आकोलकर, विनय पवार असण्याची शक्यता असल्याचे सीबीआयच्या चार्जशीटमध्ये नमूद केले होते. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून तयार केलेल्या मारेकऱ्यांचे छायाचित्र हे अकोलकर, पवारचे असल्याचे सीबीआयचे म्हणणे होते. मात्र, नालासोपारा स्फोटकप्रकरणी अटक केलेल्या कळसकर दिलेल्या माहितीनुसार सीबीआयने सचिन अंदुरे याला अटक करून अंदुरे आणि कळसकर या दोघांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे न्यायालयात सांगितले, असे बचाव पक्षाचे वकील अॅड. धर्मराज चंडेल यांनी सांगितले.
कळसकर याने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये वापरलेल्या पिस्तुलाचे तुकडे करून मुंबईतील खाडीमध्ये फेवूâन दिल्याची शक्यता सीबीआयने न्यायालयात वर्तवली होती. या शक्यतेवर विश्वास ठेवता येणार नाही. कारण ९ आणि १० ऑगस्ट रोजी एटीएसने कळसकरच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये पिस्तुले जप्त केली होती. मग कळसकर हा फक्त डॉ. दाभोलकर यांच्या हत्येतील पिस्तूल फेवूâन इतर पिस्तुले स्वतःकडे का ठेवेल? असा सवाल निर्माण होतो. त्यामुळे सीबीआयच्या या थेअरीमध्ये तथ्य नसल्याचे, अॅड. धर्मराज यांनी सांगितले.
आमच्याकडे पुरावे
डॉ. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येसंदर्भात कोणतेही ठोस पुरावे तपास यंत्रणेकडे नाहीत. त्यामुळे सुनावणी अद्यापि सुरू करण्यात आलेली नाही. याप्रकरणी अटक केलेले समीर गायकवाड, वीरेंद्र तावडे यांच्याविरुद्ध सबळ पुरावे नसल्यामुळे ते निर्दोष सुटतील, हे तपास यंत्रणेला माहीत आहे. सुनावणी सुरू झाली तर दाभोलकर हत्येमध्ये अटक केलेले अंदुरे, कळसकर, डॉ. तावडे, दिगवेकर, बंगेरा हे निर्दोष सुटतील. त्या दृष्टीने आमच्याकडे त्यांना निर्दोष सिद्ध करण्याबाबतचे पुरावे आहेत-अॅड. धर्मराज चंडेल,(बचाव पक्षाचे वकील)


























































