नाटकातला रंगकर्मी

498

>> दुर्गेश आखाडे

रंगभूमी हे असं जग जे आतून आणि बाहेरून त्याच्या वेगवेगळ्या रूपासह पाहता येतं. या जगाशी तितकंच एकरूपही होता येतं. रंगभूमीच्या पडद्याआडचा कलाकारही कलेचं वेड आयुष्यभर निभावून नेतो. अशाच काही कलाकारांपैकी एक रत्नागिरीचे रंगभूषाकार दादा लोगडे. 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त त्यांच्या कार्याचा परिचय. 

गावागावांत, पारावर मराठी रंगभूमी सशक्तपणे उभी आहे ती बॅकस्टेज आर्टिस्ट, नेपथ्यकार आणि रंगभूषाकारांमुळेच. कारण पारावरच्या नाटकात प्रत्येकाला तोंडाला रंग लावून रंगमंचावर मिरवायचं असतं. प्रत्येकाला आपण नट व्हावं असं वाटतं. अशावेळी बॅकस्टेजला काम करणारी माणसं मिळत नाहीत. रत्नागिरीत नाटय़ चळवळ उभी करताना कधी बॅकस्टेज, नेपथ्यकार, रंगभूषाकार अशा भूमिका सांभाळणारे, मुंबईतला व्यावसायिक नाटकांचा अनुभव रत्नागिरीकरांसाठी उपयोगात आणणारे बसणी गावातील ज्येष्ठ रंगकर्मी गणपत ऊर्फ दादा लोगडे. रत्नागिरीतील हौशी रंगभूमीवर नेपथ्यकार, रंगभूषाकार म्हणून काम करत मिळणाऱया चार पैशांत समाधान मानत दादा लोगडे यांनी रत्नागिरीतील हौशी नाटय़ प्रयोगात रंग भरण्याचे काम केले.

बसणी गावात अकरावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर दादा लोगडे यांनी 1978 साली मुंबई गाठली. मुंबईत स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेत असताना अर्धे वेळ नोकरीही ते करत होते. नाटकांची आवड असल्यामुळे दादा लोगडेंच्या रंगकामाच्या कलेचा प्रवास रंगभूमीपर्यंत पोहचला. मुंबईत भाऊ रांगणेकर, बाबा पार्सेकरांसारख्या नेपथ्यकारांकडे त्यांनी नेपथ्याचे धडे गिरवले. कृष्णा बोरकरांसारख्या रंगभूषाकारांकडे त्यांनी रंगभूषा आत्मसात केली. त्यावेळी आतंर गिरणी कामगारसारख्या स्पर्धांतून ते बॅकस्टेज, नेपथ्य, रंगभूषा करू लागले. त्या काळातील ‘सोबत तव प्रीतीची’, ‘कुटुंब, खोली पाहिजे’, ‘अमृत नव्हे विष’, ‘नेक जात मराठा’, ‘गारंबीचा बापू’, ‘शिवकंकण’, ‘आधेअधुरे’, ‘सीमेवरून परत’सारख्या नाटकांत दिग्गज मंडळींबरोबर काम करताना दादा लोगडे यांनी नेपथ्य आणि रंगभूषेतील बारकावे जाणून घेतले. त्या काळात पौराणिक नाटकांत पडदे रंगवले जात. कृष्णा जन्नूरकर यांच्यासारख्या त्या काळात नावाजलेल्या नेपथ्यकारांसोबत काम करताना त्यांनी अनेक धडे गिरवले. मुरारी शिवलकर, भाई सावंत, अनंत वालवलकर यांसारख्या मंडळींसोबतचा कामाचा अनुभव घेऊन दादा लोगडे रत्नागिरीत परतले.

पारावर धडपडणाऱया रत्नागिरीच्या रंगभूमीला ताकद देणारा एक रंगकर्मी मिळाला तो दादा लोगडेंच्या रूपाने. मुंबईत आत्मसात केलेले ज्ञान त्यांनी आपल्याकडे राखून न ठेवता आपल्या कलेतून रंगभूमीची सेवा करायला सुरुवात केली. मुंबईत नेपथ्यकार किंवा बॅकस्टेज करताना प्रयोगाला किमान तीस रुपये तरी मानधन मिळत होते. रत्नागिरीत आल्यावर रत्नागिरीची रंगभूमी उभी करण्यासाठी नेपथ्य आणि रंगभूषा या बाजू सांभाळताना मानधन मिळो न मिळो एक नाटय़ प्रयोग उभा राहतोय, कुणी तरी धडपडतोय यासाठी काम करायला सुरुवात केले, बसणी पंचक्रोशी, त्यानंतर जिज्ञासा थिएटर्स, समर्थ रंगभूमी अशा विविध संस्थांमधून दादा लोगडे काम करू लागले. कालांतराने नाटय़ संस्था कोणतीही असून रंगभूषाकार आणि नेपथ्यकार म्हणून दादा लोगडे हे नाव निश्चित असायचं, जणू प्रत्येक नाटकात त्यांनी रंग भरला होता.

गावात उत्सवाचं नाटक करायची हौस अनेकांना असते. पण नाटक घडायला एक नेपथ्य उभारावं लागते. त्यामुळे नाटकातील दृश्य जिवंत होतात किंवा पात्रांना रंगभूषा करून ती पात्र जिवंत करण्यासाठी एक रंगभूषाकार लागतो. रत्नागिरीची ती उणीव त्या काळात दादा लोगडेंनी भरून काढली. खेडय़ापाडय़ात कुठेही नाटक असो, दादा लोगडे ब्रश घेऊन तिथे हजर असतात. प्रयोगाचं फार बजेट नाही असं कुणी दादांना सांगितले तरी ‘तू करतोस ना मग बघू करू काहीतरी’ असे सांगून दादा नाटय़ प्रयोगाला केवळ नेपथ्य नव्हे तर आधारच उभा करत असतं.

वयाच्या 16 व्या राज्य नाटय़स्पर्धेपासून आज 59 व्या राज्य नाटय़ स्पर्धेत सहभाग घेत रंगभूमीची सेवा बजावणारे दादा लोगडे यांनी अनेक पुरस्कार, पारितोषिके पटकावली आहेत. दादा लोगडे यांनी महाराष्ट्र राज्य नाटय़ स्पर्धेत आतापर्यंत पाच वेळा नेपथ्याची प्रथम पारितोषिके पटकावली आहेत. त्यामध्ये ‘आंदोलन’, ‘गाठ आहे माझ्याशी’, ‘आहे उत्तर याला’, ‘मोहिळ’, ‘मिस फायर’ या नाटकांचा समावेश आहे. त्याशिवाय गोवा कला अकादमीच्या स्पर्धेत, सायक्लो करंडक, कामगार कल्याण राज्य नाटय़ स्पर्धेत नेपथ्याची प्रथम पारितोषिके पटकावली आहेत. वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या वतीने विशेष पुरस्कारही त्यांना मिळाला. महाराष्ट्र रंगायन दिल्ली येथील अनेक स्पर्धांमध्ये सहभाग त्यांनी घेतला. 2014 साली त्यांना नाटय़संपदा मुंबई आणि अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या वतीने त्यांना बाबा वर्दम स्मृती गौरव कै. बाबुलनाथ कुरतरकर स्मृती पारितोषिक प्रदान करून दादा लोगडेंच्या कार्याचा गौरव करण्यात आला. अलीकडे खल्वायनच्या ‘सुंदर मी होणार’ या नाटय़ प्रयोगासाठीही त्यांना पारितोषिक मिळाले. मुक्तरंग, खल्वायन, स्नेहबंध संस्थेत ते कार्यरत आहेत.

सामाजिक क्षेत्रात काम करताना दादा लोगडे यांनी बसणी गावचे सरपंचपदही भूषविले आहे. नेपथ्य आणि रंगभूषेतून हौशी रंगभूमीवरही व्यावसायिकता निर्माण होऊ शकते. तरुणांनी नट होण्याचे स्वप्न पाहताना नेपथ्य, रंगभूषासारख्या तांत्रिक बाजूही शिकल्या तर त्यातूनही रोजगार मिळू शकतो. रंगभूषाकार असो किंवा नेपथ्यकार असो तुम्ही प्रायोगिक, हौशी, पारावरच्या नाटकातही तुमचे बजेट ठरवू शकता, असा सल्ला ज्येष्ठ रंगकर्मी दादा लोगडे नव्या पिढीतील रंगकर्मींना देतात.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या