
दादरच्या सेनापती बापट मार्गावरील मच्छी मार्केट आता ऐरोलीला हलवले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणचे घाऊक व्यवसायाचे बांधकाम पालिकेने पाडले आहे. या ठिकाणी व्यवसाय करणाऱया घाऊक 27 व्यापाऱयांना ऐरोलीत अद्ययावत जागा दिली जाणार असून स्थानिक 10 किरकोळ व्यावसायिकांना अंधेरी मरोळ येथील मच्छी मार्केट मध्ये जागा दिली जाणार असल्याची माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी आज दिली.
दादर पश्चिम येथील या मच्छी मार्केट मध्ये हैदराबाद, विशाखापट्टणम येथून येणाऱया गोडय़ा पाण्यातील माशांचा घाऊक बाजार चालत होता, तर 10 स्थानिक व्यावसायिकांकडूनही किरकोळ व्यापार केला जात होता. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात येणाऱया मोठय़ा ट्रकमुळे सेनापती बापट मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होत होती. शिवाय या ठिकाणी पडणारा भुसा, मच्छीचे पाणी यामुळे परिसरात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरत होते. त्यामुळे या ठिकाणचे घाऊक मच्छी मार्केट इतर ठिकाणी हलवावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात होती. त्यानुसार गेल्या चार वर्षांपासून या ठिकाणचे मच्छी मार्केट इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी शिवसेना नगरसेविका प्रीती पाटणकर यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार या ठिकाणच्या मार्केट चे बांधकाम पाडण्यात आल्याची माहिती पाटणकर यांनी दिली.
रहिवाशांकडून निर्णयाचे स्वागत
या मच्छी मार्केट मध्ये मासळी घेऊन येणाऱया मोठय़ा प्रमाणातील वाहनांमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होत होते. रस्त्यावर पडलेला दुर्गंधीयुक्त भुसा वाहनांच्या टायर्सना लागून दूरवर जात असल्याने परिसरातील रस्त्यावर घाणीचे प्रमाण वाढत होते. याबाबत स्थानिकांनी नगरसेविका प्रीती पाटणकर यांना अनेक वेळा पत्र देऊन मार्केट हलवण्याची मागणी केली होती. हे मच्छी मार्केट या ठिकाणाहून हलवल्यामुळे स्थानिक रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत असल्याचे नगरसेविका प्रीती पाटणकर यांनी सांगितले.





























































