
दादर स्थानकातून सुटणाऱ्या लोकल आता परळ स्थानकातून सुटणार आहेत. दादर स्थानकातील फलाट क्रमांक एकवर मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. त्या पार्श्वभूमीवर सदर फलाटाची रुंदी वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून त्याची सुरुवात शुक्रवारपासून होणार आहे. त्यामुळे दादरच्या फलाट क्रमांक दोनवरून सुटणाऱ्या सर्व लोकल आता परळहून सुटणार आहेत. याचा फटका दादरहून सुटणारी लोकल पकडणाऱ्या प्रवाशांना बसणार असून त्यांची गैरसोय होणार आहे.
मध्य रेल्वेच्या दादर स्थनाकात फलाट क्रमांक एक आणि दोन एकमेकांना लागून आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, परळहून सुटणाऱ्या लोकल दादर स्थानकात फलाट क्रमांक एकवरून जातात, तर दोनवरून 11 गाडय़ा सुटतात. त्यामुळे सात मीटर रुंदी असलेल्या या फलाटावर नेहमी गर्दीच असते. त्यामुळे वारंवार गाडीतून प्रवासी पडून अपघात होत आहेत. त्याची दखल घेत रेल्वेने सदर फलाटाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दादरला गैरसोय, परळला गर्दी
फलाटाच्या कामासाठी दादरवरून सुटणाऱ्या लोकल परळवरून सुटणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत दादरहून सुटणाऱ्या लोकल पकडणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. तर सर्वच गाडय़ा परळला येणार आहेत. त्यामुळे दादर परिसरातील प्रवाशी परळला येऊन येथून सुटणारी गाडी पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळे परळच्या फलाट क्रमांक दोन आणि तीनवर सायंकाळी प्रवाशांची मोठी गर्दी उसळण्याची भीती व्यक्त होत आहे.
या गाडय़ा परळहून सुटणार
सध्या परळ स्थानकातून दररोज सहा गाडय़ा सुटतात. त्यामध्ये आता दादरच्या 11 गाडय़ांची भर पडणार आहे. सदर गाडय़ांची वेळ पुढीलप्रमाणे असणार आहे.
- परळ-कल्याण सकाळी 8.17 वाजता
- परळ-कल्याण सकाळी 9.40 वाजता
- परळ-कल्याण दुपारी 1.01 वाजता
- परळ-डोंबिवली सायंकाळी 5.56 वाजता
- परळ-कल्याण सायंकाळी 6.15 वाजता
- परळ- कल्याण सायंकाळी 6.40 वाजता
- परळ-कल्याण सायंकाळी 7.08 वाजता
- परळ-डोंबिवली रात्री 7.44 वाजता
- परळ-ठाणे रात्री 7.54 वाजता
- परळ-कल्याण रात्री 8.23 वाजता
- परळ-ठाणे रात्री 22.25 वाजता
दोन महिने काम चालणार
सध्या सदर फलाटाची रुंदी सात मीटर असून ती साडेदहा मीटरपर्यंत वाढवली जाणार आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. सदरचे काम पुढील दोन महिने चालणार आहे. त्यामुळे दादरच्या फलाट क्रमांक दोनवरून सुटणाऱ्या सर्व लोकल परळहून सुटणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.






























































