
दादरमध्ये खरेदीसाठी गाडय़ा घेऊन येणाऱया ग्राहकांचीच संख्या शेकडोंनी असते. मात्र, खरेदी करताना अशा गाडय़ा कुठेही, कशाही प्रकारे उभ्या केल्या जात असल्यामुळे वाहतूककोंडीत भर पडते. ही समस्या सोडवण्यासाठी मॉलमध्ये कर्मचाऱयांकडून केल्या जाणाऱया पार्किंगच्या धर्तीवर मुंबई महापालिका, दादर व्यापारी संघ आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने व्हॅलेट पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जी-उत्तरचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या हस्ते आज या प्रायोगिक तत्त्वावरील उपक्रमाचे उद्घाटन केले.
दादरमध्ये येणारे ग्राहक तुटू नये आणि वाहतुकीची समस्याही सुटावी यासाठी दादर व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील शहा यांनी पुढाकार घेतला. शहा यांनी ही संकल्पना जी-उत्तरचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना सांगितली आणि त्यांनी लगेच होकार देत महापालिका, दादर व्यापारी संघ आणि वाहतूक पोलिसांच्या सहकार्यातून हा उपक्रम अमलात आणला.
z रानडे रोड जंक्शन, वीर भाई कोतवाल उद्यान आणि आशीर्वाद इमारतीसमोर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तीन ठिकाणी महापालिकेने प्रत्येकी चार कर्मचारी नेमलेले आहेत.
z ग्राहकांच्या गाडय़ा ताब्यात घेऊन त्या गाडय़ा महापालिकेच्या कोहिनूर स्क्वेअरमधील महापालिकेच्या पार्किंगमध्ये उभ्या केल्या जाणार आहेत. कोहिनूरमध्ये सुमारे 1700 गाडय़ा पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे.
z पार्किंग लॉटमध्ये गाडय़ा तीन तास मोफत उभ्या करता येणार आहेत. मात्र, त्यानंतर महापालिकेच्या दराप्रमाणे पार्किंगचे शुल्क आकारले जाणार आहे.
z खरेदी पूर्ण झाल्यावर पार्क केलेली गाडी ग्राहकाला फोन करून तीनपैकी कोणत्याही सुविधा केंद्राच्या ठिकाणी मागवता येणार आहे. त्यामुळे गाडी ग्राहकाला पाहिजे त्याच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
दादर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे इथे लोकांची सतत वर्दळ सुरू असते. वाहतूककोंडीही होत असते. मात्र खरेदीसाठी येणाऱया ग्राहकांना गाडय़ा पार्क करण्याची सुविधा व्हॅलेट पार्किंगमुळे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दादरमधील वाहतूककोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.
– किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, जी-उत्तर






























































