
बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन प्रकृतिअस्वास्थ्यामुळे सोमवारी राष्ट्रीय चित्रपट सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे आता 29 डिसेंबर रोजी अमिताभ यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यातर्फे सर्व पुरस्कार विजेत्यांसाठी राष्ट्रपती भवनात अल्पोपहाराचा कार्यक्रम आयोजित केला जातो. रविवारी हा कार्यक्रम होणार असून त्यावेळी बच्चन यांना फाळके पुरस्कार दिला जाईल, असे जावडेकर यांनी आजच्या पुरस्कार सोहळ्यात सांगितले.
77 वर्षीय अमिताभ यांनी प्रकृती बरी नसल्याने राष्ट्रपती पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू न शकल्याची खंत काल ट्विटरवर व्यक्त केली होती. ‘ताप येत असल्याने प्रवास करणे शक्य नाही. दुर्दैवाने, मी दिल्लीला होणाऱया राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होऊ शकत नाही. मला खेद वाटतोय,’ असे ट्विट त्यांनी केले होते. हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीसाठी अमूल्य योगदानाबद्दल दिल्या जाणाऱया
दादासाहेब फाळके पुरस्काराचे स्वरूप सुवर्ण कमळ, 10 लाख रुपये असे आहे. दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण होते. यंदा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते फाळके पुरस्कारांचे वितरण झाले.



























































