आयकर अधिकारी असल्याचे सांगून फिल्मीस्टाइलने 80 लाख रुपये लांबवले

7

सामना ऑनलाईन । मुंबई

चित्रपटात शोभावी अशा गुह्याची उकल दहिसर पोलिसांनी केली आहे. आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून एका व्यापाऱ्याच्या घरातून रोकड व महागडे मोबाईल असा 80 लाख 40 हजारांचा मुद्देमाल घेऊन 13 जणांची टोळी पसार झाली होती. पण दहिसर पोलिसांनी शिताफीने तपास करून त्या भामट्यांच्या मुसक्या आवळल्या.

दहिसरच्या ओवरी पाडय़ात राहणारे किसन बेलवटे या व्यापाऱ्याच्या घरी 8 जूनच्या पहाटे 13 जणांची टोळी धडकली. आम्ही आयकर अधिकारी आहोत, तुम्ही घरात भरपूर पैसे बेकायदेशीरपणे लपवून ठेवले आहेत. जप्तीसाठी ते पैसे बाहेर काढा आणि कारवाईसाठी तयार व्हा, असे घाबरवण्यास सुरुवात केली. आरोपींनी ओळखपत्रदेखील दाखवल्याने बेलवटे घाबरले. मग त्यांनी घरात ठेवलेली 80 लाख 40 हजारांची रोकड काढून दिली. त्यानंतर त्यांनी आयकर विभागाची कागदपत्रे असल्याचे भासवून त्यावर बेलवटे यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आणि चौकशीसाठी ऑफिसला या असे सांगून निघून गेले. परंतु त्यांच्या हालचाली बेलवटे यांना खटकल्यामुळे त्यांनी शेजारी राहणाऱ्या दीपक शहा यांना घडला प्रकार सांगून दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत पिंगळे, पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, एपीआय जीतेंद्र कदम, गोरखनाथ घार्गे, उपनिरीक्षक चंद्रकांत घार्गे, श्रीकांत मगर, शिवाजी चोरे, संदीप शेवाळे आदींच्या पथकाने तपास सुरू केला.

आपली प्रतिक्रिया द्या