स्वप्नील कोळी यांची शाखाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 मधील शाखा क्र. 224च्या शाखाप्रमुखपदी स्वप्नील कोळी यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
जीएसटीच्या मनमानीला हायकोर्टाचा चाप
एसटीसंदर्भातील चौकशीसाठी संबंधितांना रात्रभर बसवून ठेवले जाणार नाही. यासाठी मार्गदर्शकतत्त्वे जारी केली जातील, अशी हमी केंद्र सरकारने उच्च न्यायालयात दिली. यामुळे जीएसटीच्या मनमानीला चांगलीच चपराक बसली आहे. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर केंद्र सरकारने ही हमी दिली. मार्गदर्शकतत्त्वे जारी केल्यानंतर त्याचा तपशील न्यायालयात सादर करा, असे आदेश खंडपीठाने केंद्र सरकारला दिले. यावरील पुढील सुनावणी 3 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे.
भररस्त्यात चालत्या ‘बेस्ट’ बसला आग; प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली
पालिकेच्या ‘बेस्ट’ उपक्रमातील भाडे तत्त्वावरील एक सीएनजी बस आज घाटकोपर गांधीनगर एलबीएस रोड येथे भररस्त्यात इंजिनमध्ये आग लागून खाक झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. आग लागल्याप्रसंगी या बसमध्ये प्रवासी नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेत बस वाहकाला हाताला भाजल्याने ते जखमी झाले आहेत, तर बसचालक बचावला आहे. ‘बेस्ट’ उपक्रमाची (धारावी डेपोची कंत्राटदार मातेश्वरी कंपनीची बस) बस मार्ग क्र. 303 ही बस वांद्रे स्टेशन (प.) ते मुलुंड स्टेशन यादरम्यान धावणारी बसगाडी आहे. ही बसगाडी सोमवारी दुपारी 1.35 वाजताच्या सुमारास लघुफेरी पूर्ण करून वळण घेऊन वांद्रे येथे जात असताना बसला आग लागण्याची घटना घडली. ही आग कशी लागली, आगीचे नेमके कारण काय, याबाबत बेस्ट उपक्रम, स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नागपूरमध्ये हिट अॅण्ड रन, भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे जागीच ठार
पुणे जिह्यात घडलेल्या हिट अॅण्ड रननंतर राज्यात ठिकठिकाणी बेदरकार चालकांमुळे घडलेल्या हिट अॅण्ड रन अपघातांची मालिकाच समोर आली आहे. सोमवारी नागपूरचा केळवद परिसरही अशाच अपघाताने हळहळला. केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर छिंदवाडा महामार्गावर एका मोटारीने जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 12 च्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर मोटरचालकाने अपघातस्थळावरून पळ काढला. स्थानिकांनी या भीषण अपघाताची खबर दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपघाताचा पंचनामा केला.
महिला सशक्तीकरण अभियानासाठी मोदी शनिवारी ठाण्यात
महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी ठाण्यात येणार आहेत. घोडबंदर मार्गावरील कासारवडवली येथील वालावलकर मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मोदींच्या हस्ते विविध उपक्रम व कार्यक्रमांचे उद्घाटन तसेच लोकार्पणही होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 नंतर तब्बल दहा वर्षांनी शनिवारी दुसऱ्यांदा ठाण्यात येणार आहेत. शासनाकडून राबवलेल्या विविध उपक्रमांच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने पोलिसांकडून मैदानाची तपासणी केली जात आहे. या पंतप्रधान दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी आज ठाणे महापालिका मुख्यालयात नियोजन बैठक पार पडली. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन मुख्य सभामंडप, पार्किंग व्यवस्था याचे नियोजन करण्यात येणार आहे. ठाणे तसेच आसपासच्या महापालिकांमधून सुमारे 1200 बसगाड्या सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर प्रबोधन सभा
रिपब्लिकन पक्षाचा 68वा स्थापना दिन आणि त्याचे एक संस्थापक-नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर एक प्रबोधन सभा पार पडणार आहे. आंबेडकरवादी भारत मिशन आणि डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अॅण्ड इकॉनॉमिक चेंज या संस्थांनी अर्थतज्ञ, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातील सुरेंद्र गावस्कर सभागृहात ही सभा आयोजित केली आहे.
भारतनगरचा पुनर्विकास म्हाडानेच करावा
वांद्रे पूर्व भारतनगर येथील जागा ही म्हाडाची आहे. त्यामुळे पुनर्विकासाला आमचा विरोध नाही. मात्र ‘म्हाडा’नेच या जागेचा विकास करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली. या मागणीसाठी रहिवाशांनी वांद्रे पूर्व भारतनगर येथे उपोषण सुरू केले आहे. भारत नगर येथील झोपडपट्टीवर आज एसआरएकडून पाडकामाची (डिमोलिशन) कारवाई केली जाणार होती. या कारवाईविरोधात स्थानिक रहिवाशी रस्त्यावर उतरले. रहिवाशांनी कारवाईला विरोध करीत कारवाई थांबवा अशी मागणी करीत उपोषण आंदोलन सुरू केले. भारतनगर झोपडपट्टीवर मनमानी कारवाई करू देणार नाही, असा इशाराही स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांनी रहिवाशांच्या वतीने दिला आहे. जोपर्यंत कारवाईचा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.