ढगफुटी सदृश पावसामुळे परळी तालुक्यात शेतीचे नुकसान

परळी तालुक्यातील काही गावांमध्ये शुक्रवारी दुपारी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पांगरी, लिंबोटा, तळेगाव या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांकरून केली जात आहे.

तालुक्यातील पांगरी, लिंबोटा, तळेगाव या गावांना ढगफुटी सदृश पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. अतिवृष्टी झाल्याने छोटया, मोठ्या नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने शेतात पाणी घुसून उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीने हिरावून घेतला, ज्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट आले आहे. ढगफुटीने बळीराजा पुर्ण कोलमडून गेला असून त्याला मदतीचा हात देण्याची नितांत गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पिकांचे देखील मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे आता यावर प्रशासन काय कार्यवाही करते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.