मुणगे सडा येथे लागलेल्या आगीत फळबागांचे नुकसान!

देवगड तालुक्यातील मुणगे आडवळवाडी आणि लब्देवाडी सड्यावरील गवळदेव देवस्थानाजवळ मंगळवारी, सकाळी 11च्या  सुमारास आग लागली. या घटनेत येथील ग्रामस्थांच्या काजू, आंबा झाडांसह गुरांच्या वैरणीचे नुकसान झाले आहे.

लब्देवाडी येथील गणपत रुपे यांच्या भाताच्या रचून ठेवलेल्या पेंढ्यांना आग लागली. या पेंढ्या पूर्णत: जळून खाक झाल्या आहेत. आगीची घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. खासगी वाहनांनी ग्रामस्थांनी पाणी आणून गवताच्या पेंढ्यांवर टाकल्यामुळे लागलेली आग विझली. त्यामुळे जवळ असलेल्या शेतमांगर परिसराचे आगीपासून रक्षण झाले.

ही आग विझवण्यासाठी आणि होणारी जीवितहानी टाळण्यासाठी विजय रुपे, मंगेश हाटले, संतोष नाटेकर, प्रकाश लब्दे, साहिल लब्दे, संदेश लब्दे, दीपक राणे, गुरुनाथ रुपे, संकेत रुपे,  सुरेश रुपे, जयवंत सावंत, आदी ग्रामस्थांनी मदत केली. विद्युत भारित तारांमधून ठिणगी पडल्याने सुकलेल्या गवताने पेट घेतल्यामुळे ही आग लागल्याची घटना घडली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या