
सामना प्रतिनिधी । परभणी
गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेबरोबर आमची युती असून ही युती पुढेही अशीच चालूच राहणार यात शंका नाही. भाजप आणि शिवसेना हे दोन वेगवेगळे पक्ष असून त्यांची ध्येय धोरणे देखील वेगळी आहेत. तथापी, शिवसेनेसह समविचारी पक्षांना सोबत घेऊन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुक लढविणार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी परभणीत पत्रकार परिषदेत केले.
दानवे हे सध्या राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आहेत. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र दौरा केल्यानंतर नांदेड, हिंगोली, परभणी दौरा केला असल्याची माहिती त्यांनी सर्वप्रथम दिली. या दौऱ्यादरम्यान बुथ संघटन आणि दिलेल्या आश्वासनाची पुर्तता कार्यकर्त्यांकडून झाली आहे का याबाबतची चाचपणीही त्यांनी केली. राज्यात सध्या दोन महानगरपालिकेत भाजप स्वबळावर निवडणुका लढवित आहेत. सध्या पक्ष संघटन कार्यात विशेष लक्ष देत असून पक्ष जो आदेश देईल, त्याप्रमाणे पुढील कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशात व राज्यात एनडीएला अनुकूल परिस्थिती असल्याने आगामी निवडणुकात यश निश्चित आहे. केंद्र सरकारचे साडेचार वर्षाचे काम आणि राज्याचे चार वर्षाचे काम जनतेसमोर असून या कामाची पावती म्हणून जनता एनडीएच्या पाठीशी राहिल, असा विश्वास यावेळी बोलून दाखविला. राम मंदिर संदर्भात शिवसेनेने आयोध्येत जी भूमिका घेतली आहे, त्या भूमिकेचे स्वागत करत असल्याचे दानवे यांनी सांगितले. दोन्ही काँग्रेसच्या विरोधात लोकसभा-विधानसभा निवडणुकीत शिवसेना हा समविचारी पक्ष भाजपसोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परभणी जिल्ह्यात सध्या 4 हजार कोटी रुपयांच्या रस्त्याची कामे चालू असून ही कामे संथगतीने होत आहेत. याकडे लक्ष वेधले असता, ही कामे जलदगतीने करण्यासंदर्भात सुचना देण्यात आले असल्याची माहिती यावेळी दिली. यावेळी आमदार मोहन फड, जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, संघटनमंत्री भाऊसाहेब देशमुख, डॉ. मीना परतानी, बालाजी देसाई, राहुल लोणीकर, शिवाजी भरोसे, शहराध्यक्ष अभय चाटे आदी उपस्थित होते.

































































