नर्तकीसह अल्पवयीन मुलीस जातिवाचक शिवीगाळ, श्रीरामपूरातील 19 जणांवर अॅट्रोसिटी दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीरामपूर येथील नर्तकी व तिच्यासोबत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस जातिवाचक शिवीगाळ करून धक्काबुकी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात 19 जणांविरुद्ध अॅट्रोसिटी, विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा नोंदविला आहे. नर्तकीच्या बहिणीच्या मुलीस पोलिसांच्या मदतीने सोडवणूक करून स्नेहालय संस्थेत पाठविल्याच्या रागातून ही शिवीगाळ झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी स्नेहालय मधील पीडितेच्या मावशीने न्यायालयात तक्रार दिली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.

याबाबतची माहिती अशी, शहरातील प्रभाग दोन मधील गोपीनाथनगर परिसरातील नर्तकीच्या बहिणीची मुलगी तिच्याकडे राहत होती. पोलिसांच्या मदतीने नर्तकीने या मुलीला नगर येथील स्नेहालय संस्थेत पाठविले. त्या राग धरून आरोपींनी नर्तकीच्या घरासमोर जमुन नर्तकीसह तिच्या मुलीला शिवीगाळ व लाकडी दांड्याने मारहाण केली. अल्पवयीन मुलीस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. यावेळी आरोपींनी विनयभंगाचा प्रयत्न करत जातिवाचक शिवीगाळ केली, असे पीडितेने न्यायालयात दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहर पोलिसांनी सोमवारी सांयकाळी शाहरुख अन्सार शेख (वय 23) काद्या उर्फे अरबाज अन्सार शेख (वय 21), सरफराज उर्फ लड्या अन्सार शेख (वय 19), शबाना अन्सार शेख (वय 40 सर्व रा. गोपीनाथनगर, श्रीरामपुर) यांच्यासह अन्य 15 अनोळखी व्यक्तींविरुद्ध अॅट्रोसिटी, विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस उपअधिक्षक राहुल मदने करीत आहेत.