पोलिस पाटील भरतीत अनियमितता; दापोलीत शिवसेनेतर्फे निषेध

मनमानी काम करणा-या प्रांत अधिका-याचा निषेध असो….. कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवणा-या प्रांत अधिका-याचा निषेध असो…. मनमानी कारभार करणा-या प्रांत अधिका-याचा निषेध असो… प्रांत अधिकारी म्हणून सर्वसामान्यांना वेठीस धरणा-या प्रांत अधिका-याचा धिक्कार असो….,या प्रांताच करायच काय खाली डोकं वरती पाय….. अशाप्रकारच्या दमदार घोषणा देत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षांच्या कार्यकर्त्यांसह वणौशी तर्फे नातू येथील ग्रामस्थांनी दापोली दणाणून सोडली. दापोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या पोलीस पाटील भरतीत मोठया प्रमाणात अनियमितता झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निषेर्धात दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे शुक्रवारी दापोली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तोंडाला काळया फिती बांधून सायंकाळी उशिरापर्यंत प्रांता अधिकाऱ्याचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. यामध्ये वणौशी तर्फ नातू या गावातील काही ग्रामस्थांनीही आपला सक्रीय सहभाग घेतल्याने या आंदोलनाची अधिक तीव्रता वाढली.

दापोली उपविभागीय कार्यालयामार्फत सदोष अशा पध्दतीच्या घेण्यात आलेल्या पोलिस पाटील भरती संदर्भात माजी आमदार संजय कदम यांनी एक निवेदनही दापोली उपविभागीय अधिकारी कार्यालयात दिले असून त्यात दापोली तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेत मोठ्याा प्रमाणात घोळ झाला असल्याने अनेक होतकरू तरुणांचे नुकसान झाले आहे. या भरती प्रक्रियेत अनेक होतकरू व गुणवंत तरुणांनी सहभाग घेतला होता. लेखी परीक्षेत उत्तम गुण मिळाले असूनही तोंडी परीक्षेत अनेकांना यश मिळाले नाही. काही उमेदवार ते व्यवसाय करत असल्याने त्यांना नापास करण्यात आले. तर अनेक ठिकाणी राजकीय दबाव वापरून गुणवंताना डावलण्यात आले आहे.

वणौशी तर्फे नातू या गावातील पोलीस पाटील पदासाठीचा उमेदवार सुरज महिपती चव्हाण हा लेखी व तोंडी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाला असतानाहि त्याची नियुक्ती करण्यात आली नाही व अन्य उमेदवाराची या गावात नियुक्ती करण्यात आली आहे. हा प्रकार गंभीर आहे असे म्हणण्यात आले आहे. त्यांची निवड करून एकप्रकारे त्यांचा प्रांतांनी सन्मानच केला असल्याचा आरोप करत ही बाब म्हणजे सज्जनांवर अन्याय असल्याची सडेतोड भुमिका उदाहरणे देत प्रसार माध्यमांसमोर माजी आमदार संजय कदम यांनी स्पष्ट केली. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तो पर्यंत आंम्ही लढतच राहणार असून वेळ प्रसंगी न्यायासाठी उच्च न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला जाईल असे माजी आमदार संजय कदम हे आंदोलना दरम्यान बोलताना म्हणाले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे दापोली तालुकाध्यक्ष ऋषिकेश गुजर, नगराध्यक्षा ममता मोरे, शिवसेना उप जिल्हा संघटीका मानसी विचारे, तालूका सचिव नरेंद्र करमरकर, शिवसेना शहर प्रमुख आणि नगरसेवक संदिप चव्हाण, उमेश शिंदे, अपी मोरे, विक्रांत गवळी आदी शिवसेना लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्यासह वणौशी तर्फे नातू येथील काही ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. या सर्वांनी उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या निषेधाच्या घोषणा देत धिक्कार करत कार्यालयाच्या बाहेर जमिनीवर बसकण मारली.

आंदोलक जेव्हा कार्यालयात आले तेव्हा उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले हे दापोली बाहेर असल्याने कार्यालयात नसल्याने नायब तहसीलदार वैशंपायन यांनी निवेदन स्वीकारले. काही वेळाने डॉ. थोरबोले कार्यालयात आले व त्यांनी आंदोलकांजवळ चर्चा केली. आपण सर्व प्रक्रिया नियमानुसार व न्यायालयाच्या निर्णयानुसार राबविली असल्याचे त्यांनी सांगितले तर माजी आमदार संजय कदम यांनी या भरती प्रक्रियेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.