दापोलीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली शहरासह संपुर्ण तालुक्यात बरसलेल्या अवकाळी पावसाने सर्वांचीच दाणादाण उडवून दिली. दिवसभर ढगाळ वातावरण होते, उष्माही वाढला होता. दोन दिवसापुर्वीच दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विदयापीठाच्या हवामान केंद्राने पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली होती ती शक्यता आज सांयकाळी 7 वाजल्यापासून जोरदार कोसळलेल्या पावसाच्या सरींनी घराबाहेर पडलेल्यांना ओलेचिंब करून तंतोतंत खरी करून दाखविली.

सांयकाळच्या सुमारास दापोली शहरात खरेदी साठी तसेच फिरण्यासाठी बाहेर पडलेल्यांना अचानक कोसळलेल्या पावसाने काही वेळ जागेवर खिळवून ठेवले होते. अवकाळी पावसामुळे विज पुरवठा खंडीत झाल्याने संपुर्ण तालुका हा अंधारात बुडाला होता.

दररोजच्या वातावरणातील बदलाने कधी गारवा तर कधी पावसाचा शिडकावा तर कधी जाणवणाऱ्या उष्म्याने तालुक्यातील आंबा, काजु बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या प्रसारापासून संकटाची सुरू झालेली मालिका निसर्ग चक्री वादळानंतर तरी थांबेल असे वाटत असतानाच अवकाळी पावसाने बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळवले.