
‘दार उघड बये’ ही मालिका 19 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचे प्रोमो बघून प्रेक्षकांची उत्पंठा नक्कीच शिगेला पोहोचली असेल. शरद पोंक्षे, सुहास परांजपे, किशोरी आंबिये, रुचिरा जाधव अशी तगडी कलाकारांची फौज ही या मालिकेची जमेची बाजू म्हणावी लागेल.
या मालिकेत सानिया चौधरी मुख्य भूमिका साकारत आहे. ती एक उत्तम नृत्यांगना असून तिने या भूमिकेसाठी संबळ वादनाचे आवर्जून प्रशिक्षण घेतले. भूमिकेबद्दल सानिया म्हणाली, ‘मी मुक्ता ही भूमिका साकारत असून घर सावरण्यासाठी घराण्याची संबळ वादनाची कला मी आत्मसात करते. अर्थार्जन करून संबळ वाजवण्याची परंपरा जोपासते. हे एक असं गाव आहे जिथे मुलीच्या हातात संबळ बघणं एक अपशकुन मानलं जातं. फक्त त्या गावात नाही तर महाराष्ट्रातील बऱयाच गावांमध्ये अजूनही मुलींनी संबळ वाजवणं चांगलं मानलं जात नाही. अशा गावात एक साधी, गरीब पण स्वाभिमान जपणारी मुलगी आणि पुरुष प्रधान संस्कृती याचा लढा या मालिकेत दिसणार आहे.’




























































