
लॉकडाऊनमुळे लग्न सोहळे तसेच गुढीपाडवा, रक्षाबंधन, अक्षयतृतीया हे सण सराफांच्या हातून गेले होते. त्यामुळे सराफा व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले. मात्र आज दसरा सणाने सराफा बाजाराला सावरले.
ग्राहक काळजी घेऊन खरेदीला बाहेर पडले. ग्राहकांनी बजेट कमी करून का होईना खरेदीचा मुहूर्त गाठला. दागिन्यांची विक्री कमी झाली असली तरी 51 हजारांपर्यंत वाढलेल्या सोन्याच्या दराने सराफा बाजारात संतुलन राखले. गेल्या वर्षीच्या तुलनेत 70 ते 80 टक्के व्यवसाय झाल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
अनलॉकच्या टप्प्यात सराफा व्यापार पूर्वपदावर होतोय. मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग पाळून सराफांची दुकाने सुरू आहेत. आज दसऱयाच्या मुहूर्तावर गेल्या सात महिन्यांची खरेदीची कसर काही प्रमाणात भरून निघण्याची अपेक्षा होती. ती सगळीच पूर्ण झालेली नसली तरी निराशादायक चित्रही नव्हते.
गेल्या वर्षीपेक्षा दागिन्यांची खरेदी कमी झाली. बजेटमध्ये बसतील अशा ऑर्डर बुक करण्याकडे ग्राहकांचा कल होता. मात्र सराफाच्या दृष्टीने बघितले तर सोन्याचे भाववाढीने त्यांना सावरले, उलाढाल समाधानकारक झाली. दसऱयानंतर पुढच्या महिन्यात दिवाळी सण येतोय. त्यामुळेच येत्या दिवसांत सराफा बाजार सावरेल अशी अपेक्षा आहे.
दसऱयाला 24 कॅरेट सोन्याच्या भाव 51 हजार रुपये प्रतितोळा तर 22 कॅरेटचा दर 49 हजार रुपयांपर्यंत राहिला. गेल्या वर्षी सोन्याचा दर 38 हजार 500 रुपयांपर्यंत होता. वर्षभरात 12 हजारांपर्यंत वाढ झाली आहे.
गेल्या सात महिन्यांची मरगळ आज कमी झाली. दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहक आले. त्यामुळे सणासुदीचे वातावरण वाटले. आता आगामी दिवाळी सण आणि लग्न खरेदीवर भिस्त आहे. आज मागीच्या वर्षीच्या तुलनेत 80 टक्के विक्री असा प्राथमिक अंदाज आहे. म्हणजे साधारण 20 टक्के इतकी विक्रीत घट असेल. – सौरभ गाडगीळ, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स
सराफा बाजार हळूहळू सावरतोय. सोन्याचे दर वाढले आहेत, लोकांच्या हातात अजून पैसा नाही. कारागीर अजून गावावरून परतले नाहीत. त्यामुळे सावरायला वेळ लागतोय. येत्या काळातील लग्न समारंभामुळे मदत होईल. दसऱयाला 65 ते 70 टक्क्यांपर्यंत व्यवसाय झाला.- कुमार जैन, जेम्स अॅंड ज्वेलरी असोसिएशन
महामारी असूनही आज दसऱयाला खरेदीचे चांगले वातावरण दिसून आले. दुकानांमध्ये सुरक्षेचे सर्व नियम पाळले जात आहेत. गेल्या वर्षीपेक्षा दागिन्यांची विक्री 10 ते 15 टक्के कमी झाली असली तरी आशादायी चित्र आहे.- आशीष पेठे, वामन हरी पेठे ज्वेलर्स




























































