
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत उद्या बीड जिल्ह्यातील घाट सावरगाव येथे होणाऱ्या मेळाव्यास तालुक्यातून मोठ्या संख्येने मुंडे समर्थकांनी जाण्याचा घाट घातला आहे. तर दुसरीकडे भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांच्या काही समर्थकांनी चलो भगवानगडचा नारा दिल्याने उद्या भगवानगडावर नेमके किती भाविक भगवान बाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी येणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि दसऱ्याच्या दिवशी भगवान गडावर मेळावा होण्याची परंपरा पूर्वापार चालू असली तरीही १९९५ साली भगवान गडावर दसऱ्याच्या दिवशी माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे व स्व. गोपीनाथ मुंडे यांचा जाहीर वाद झाल्याने भगवानगड राज्याच्या राजकीय नकाशावर ठळकपणे समोर आला. भगवानगड हा ऊसतोड मजुरांचे श्रद्धास्थान असल्याचे हेरत मुंडे यांनी दसऱ्याच्या दिवशी पार पडणाऱ्या मेळाव्याला मोठे स्वरूप देत ऊसतोड मजुरांवरील आपली पकड आणखी घट्ट केली. गडावर आपण राजकरण करत नाही असे नेहमी मुंडे म्हणत असले तरीही त्यांनी या मेळाव्याला राज्याच्या व देशाच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या अनेक बड्या नेत्यांना आणत गडाचे महत्व देशपातळीवर नेल्याने गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे नेहमीच लक्ष लागून राहिलेले असायचे.
मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यू नंतर ही परंपरा त्यांची कन्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दोन वर्ष चालवली मात्र. त्या नंतर गडाचे महंत नामदेवशास्त्री व पंकजा मुंडे यांचे मतभेद झाल्याने मागील वर्षांपासून पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांचे जन्मस्थळ असलेल्या बीड जिल्ह्यातील घाट सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यास सुरवात केली आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने जमावे असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, आमदार मोनिका राजळे व कार्यकर्त्यांनी केले आहे. तसेच गावोगावी बैठका घेऊन तालुक्यातून मोठ्या संख्येने मुंडे समर्थक या मेळाव्यास जाणार असले तरीही नामदेव शास्त्री यांच्या काही समर्थकांनी सुद्धा चलो भगवानगड चा नारा देत गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमावी असे नियोजन केले आहे. या नियोजनाचा एक भाग म्हणून दसऱ्याच्या दिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना सुद्धा गडावर येण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र धनंजय मुंडे यांनी या वादात पडण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर उद्या भगवान गडावर नेमकी किती गर्दी जमा होणार या कडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

































































