फिनिक्स फुड हॉलवर धाड, डेट एक्सपायरी माल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अन्न व औषध प्रशासन खात्याच्या अधिकाऱ्यांनी नुकताच लोअर परळ, मुंबई येथील फिनिक्स फुड मॉलवर धाड टाकून वैधता तारीख (डेट एक्सपायरी) संपलेला माल जप्त केला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी अ. र. दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरळीनाका येथे रहाणाऱ्या अमूल खिमजी वाघेला यांनी फिनिक्स फुड मॉल येथून पेप्सी कंपनीचे डायट पेप्सी ३०० मिली, डोरीटोस कुल रँच, ट्रॉपिकोना पायनॅपल डिलाईट, ट्रॉपिकोना लिची डिलाईटचा माल खरेदी केला. त्याची रितसर बिलेही घेतली मात्र घरी गेल्यानंतर या सर्व मालाची वैधता तारीख गेल्या वर्षीच संपल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरीत या बाबत अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त डि. के. सावंत यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यावरून अन्न व औषध प्रशासन खात्याच्या अधिकाऱ्यांनी फिनिक्स फुड मॉलवर धाड घातली. यावेळी अमूल वाघेला यांनी केलेल्या तक्रारीत त्यांना तथ्य आढळून आले. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्येच वैधता तारीख संपलेला खुप सारा साठा या मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या अधिकाऱ्यांनी हा माल जप्त केला असून फुड मॉलविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

आम्ही सजग होतो म्हणून हा प्रकार उघडकीस आला. असा कितीतरी प्रकारचा वैधता संपलेला माल फिनिक्स फुड मॉलने आजपर्यंत ग्राहकांना विकला गेला असेल. त्यांच्या सर्वच विभागांवर धाडी टाकून तपासणी व्हायला हवी आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बड्या धेंडांवर कारवाई व्हायला हवी. – अमूल खिमजी वाघेला