अमर, ओम पिंपळेश्वरची विजयी सलामी

लोअर परळमधील विजय नवनाथ मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दत्ताजी नलावडे सुवर्ण चषक स्पर्धेच्या उद्घाटनीय सामन्यात अमर क्रीडा मंडळाने यंग विजय मंडळाचा 56-25 असा धुव्वा उडवला. तसेच ओम पिंपळेश्वर मंडळाने सूर्यकांत व्यायामशाळेवर 38-17 अशा एकतर्फी विजयाची नोंद केली.

एकापेक्षा एक अशा 29 संघांचा सहभाग असलेल्या विजय नवनाथच्या प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी आमदार सुनील शिंदे, आमदार सचिन अहिर, वरळी विधानसभा संघटक निरंजन नलावडे, युवा सेना उपसचिव संदीप वरखडे, मंडळाचे अध्यक्ष विजय वाडेकर, सचिव सुरेश नाईक आणि खजिनदार गोविंद नाईक उपस्थित होते. आज झालेल्या एकतर्फी सामन्यांनी प्रेक्षकांची घोर निराशा केली. सलामीच्या सामन्यात अमर क्रीडा मंडळासमोर यंग विजयच्या खेळाडूंचे फारसे चालले नाही तर ओम पिंपळेश्वरने सूर्यकांतला गुणच मिळवू दिले नाही.