
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दक्षिण पूर्व दिल्लीतील सीलमपूर भागात एका नराधम पित्याने रागात आपल्या पाच वर्षाच्या मुलीच्या कानाखाली लगावली. पण हा मार वर्मी लागल्याने तिची शुद्ध हरपली. त्यानंतर हादरलेल्या वडिलांनी तिला रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सलोनी असे या चिमुरडीचे नाव आहे, तर अनिल राजा असे आरोपीचे नाव आहे.
अनिल यांना दारुचे व्यसन असून यावरुन त्यांचा पत्नीबरोबर रोज वाद व्हायचा. शनिवारीही अनिल दारु पिऊन आल्याने पत्नीने त्रागा केला. यावरुन पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी चिडलेल्या अनिल यांनी पत्नीला मारहाण करण्यास सुरूवात केली. सलोनी हा सर्व प्रकार घराच्या कोपऱ्यात उभे राहून बघत होती. तिला बघितल्यावर अनिल अधिकच चवताळला. त्याने तिच्या कानाखाली जोरदार लगावली. हा मार सलोनीच्या वर्मी बसला व ती बेशुद्ध पडली. तिच्या नाकातून रक्त येऊ लागले. यामुळे अनिल घाबरला व त्याने तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी अनिलला अटक केली.


























































