
ऑस्ट्रेलियात झालेला टी-20 वर्ल्डकप क्रीडा चाहत्यांसाठी पर्वणी ठरला. अगदी सुरुवातीपासून चाहत्यांना थरार पहायला मिळाला. दोन वेळचा विजेता वेस्ट इंडिजचा संघ ग्रुप स्टेजच्या आधीच बाहेर पडला, त्यानंतर आयर्लंडचा इंग्लंडवर आणि झिम्बाब्वेचा पाकिस्तानवर थरार विजय. विशेष म्हणजे ग्रुप स्टेजला कमकुवत संघाकडून पराभूत झालेले हे दोन्ही संघच फायनलला पोहोचले. फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप उंचावला.
टी-20 वर्ल्डकपमधील आणखी एक मोठा उलटफेर म्हणजे गतविजेता आणि यजमान ऑस्ट्रेलिया ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. अशातच आता एका दिग्गज खेळाडूने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्याने याबाबत विधान केले आहे. या खेळाडूचे नाव आहे डेव्हिड वॉर्नर.
वर्ल्डकपमध्ये डेव्हिड वॉर्नरने सलामीवीराची भूमिका पार पाडली. मात्र तो खास कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे आता त्याने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मात्र तो टी-20 नाही तर कसोटी क्रिकेटला रामराम करण्याची शक्यता आहे. कसोटी क्रिकेट हा पहिला फॉरमॅट असेल जो मी सोडू शकतो. कदाचित हे माझे कसोटी क्रिकेटमधील शेवटचे 12 महिने असतील. ऑस्ट्रेलियाचे2023 कसोटी क्रिकेटचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये हिंदुस्थानात होणार्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचाही यात समावेश आहे, असे वॉर्नर म्हणाला.
कसोटीचे शतक झळकावून निवृत्ती?
डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज असून 2011 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 96 कसोटीत लढतीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले असून यात त्याने 46.52 च्या सरासरीने 7 हजार 817 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 24 शतकांचा आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी सामन्यांचे शतक पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त 4 सामन्यांची गरज असून यानंतर तो निवृत्तीची घोषणा करू शकतो.
टी-20 आणि वन डे वर फोकस
दरम्यान, पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हिंदुस्थानमध्ये वन डे वर्ल्डकप खेळला जाणार आहे, तर वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत 2024 चा टी-20 वर्ल्डकप होणार आहे. या दोन्ही स्पर्धा खेळण्याची इच्छा वॉर्नरने व्यक्त केली आहे. मला मर्यादित षटकांचे क्रिकेट आवडते, खूपच शानदार सामने असतात. मला टी-20 क्रिकेटमध्ये खेळायला आवडते आणि मला 2024 च्या वर्ल्डकपमध्ये खेळायचंय, असे वॉर्नर म्हणाला.

























































