डे-नाईट कसोटीचे आव्हान; बीसीसीआयची एसजीकडे 72 गुलाबी चेंडूंची मागणी

460
pink-ball

सौरभ गांगुली याने बीसीसीआयचा अध्यक्ष होताच हिंदुस्थानी क्रिकेटमधला सर्वात मोठा निर्णय घेतला. हिंदुस्थान-बांगलादेश यांच्यामध्ये 22 नोव्हेंबरपासून कोलकाता येथे खेळविण्यात येणारी कसोटी ‘डे-नाइट’ होणार असल्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली. बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही ही मागणी मान्य केली. पण आता यापुढील प्रवास खडतर आहे. बीसीसीआय व बंगाल क्रिकेट असोसिएशनपुढे उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा घेतलेला हा आढावा.

अपुरा सराव

हिंदुस्थान-बांगलादेश यांच्यामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. मात्र दोन कसोटींदरम्यान फक्त चारच दिवसांचा अवधी आहे. अशा वेळी दोन्ही संघांतील खेळाडूंना ‘डे-नाइट’ कसोटीचा पुरेसा सराव करायला मिळणार नाही. शिवाय लढतीआधी सराव सामन्याचे आयोजनही करण्यात आलेले नाही. दोन्ही संघांतील खेळाडूंना ‘डे-नाइट’ कसोटी खेळण्याचा अनुभवही नाही.

मैदानावरील दवाचा फटका बसू शकतो

आतापर्यंत जागतिक स्तरावर 11 ‘डे-नाइट’ कसोटी खेळल्या गेल्या आहेत, पण या सर्व कसोटी उन्हाळ्यात आयोजित करण्यात आल्या होत्या. हिंदुस्थानात होणारी पहिलीवहिली ‘डे-नाइट’ कसोटी मात्र हिवाळ्यात खेळविण्यात येणार आहे. त्यामुळे रात्रीच्या सत्रात मैदानावर पडणारे दव खेळाडूंना अडचणीचा विषय ठरू शकतात. मात्र कोलकात्यात होणारी लढत दुपारी 1 वाजता सुरू करण्याचा प्रयत्न बोर्डाकडून करण्यात येणार आहे. जेणेकरून फक्त अखेरच्या सत्रात खेळाडूंना त्रास होण्याची शक्यता आहे.

खेळाडूंच्या दैनंदिनीमध्ये होणार बदल

कसोटी ‘डे-नाइट’ असल्यामुळे खेळाडूंच्या दैनंदिनीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. वन डे सामना हा फक्त एक दिवसाचा असल्यामुळे खेळाडूंच्या शरीराला ती सवय झालेली असते. पण पाच दिवसांच्या कसोटीत खेळाडूंच्या खाण्यापिण्याच्या वेळेमध्येही बदल होतो. यामुळे खेळाडूंच्या कामगिरीत फरक पडू शकतो.

एसजी गुलाबी चेंडू कोणता रंग दाखवणार

हिंदुस्थानातील ‘डे-नाइट’ कसोटीसाठी डय़ुक्स व कुकाबुरा गुलाबी चेंडूंची मागणी करण्यात येईल अशी शक्यता निर्माण झाली होती. पण सौरभ गांगुलीने एसजी गुलाबी चेंडूंनाच प्राधान्य दिले. एसजीकडून 72 चेंडू मागविण्यातही आले आहेत. मात्र एसजी गुलाबी चेंडू प्रत्यक्षात कसोटी सामन्याप्रसंगी कोणता रंग दाखवेल याबाबत दोन्ही संघांतील खेळाडूंना काहीही माहीत नाही. शिवाय याआधी 2017 साली हा चेंडू स्थानिक स्पर्धांमध्ये वापरण्यात आला होता, पण त्यावेळी या चेंडूचा शेप व रंग निघून गेल्याची घटना घडली होती. त्यामुळे हेही आव्हान बीसीसीआयसमोर असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या