
हिंदुस्थानातील पहिली स्पोर्टस् कार कंपनी असा नावलौकिक मिळवलेल्या दिलीप छाब्रिया डिझाईन प्रा. लि. कंपनीचा मोठा झोल उघडकीस आला आहे. डीसी डिझाईन कंपनीने कारची खरेदी विक्री, विविध वित्तसंस्थांकडून आवश्यक कागदपत्रांविना मिळवलेले कर्ज, अनेक गाडय़ांना एकच चेसिस व इंजिन नंबर देऊन त्या गाडय़ांची विक्री करून कोटय़वधी कमावल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी कंपनीचा संचालक दिलीप छाब्रिया याला गुन्हे शाखेने बेडय़ा ठोकल्या आहेत.
18 डिसेंबर रोजी ताज हॉटेलजवळ एक डिसी अवंती कार येणार असून त्या कारचा चेसिस व इंजिन नंबर बोगस असल्याची खबर सीआययूचे सचिन वाझे यांना मिळाली. त्यानुसार वाझे व त्यांच्या पथकाने हॉटेल ताजबाहेर सापळा रचून अवंती कार तेथे येताच ती ताब्यात घेतली. कारचालकाने गाडीचे कागदपत्र दाखवले. पण पोलिसांनी कारचा इंजिन व चेसिस नंबर तपासला असता कंपनीची बोगसगिरी समोर आली. जप्त कार तामीळनाडू येथे रजिस्टर होती तर त्याच नंबरवर हरियाणा येथेही अवंती कार रजिस्टर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी आणखी खोलात जाऊन तपास केला असता डीसी कंपनी करत असलेला फसवणुकीचा भंडाफोड झाला. डीसी कंपनीने एकाच इंजिन व चेसिस नंबरवर अनेक ठिकाणी आपल्या अवंती कार रजिस्टर करून विकल्याचे स्पष्ट झाले. कंपनीने कारवर वित्त संस्थांकडून कर्ज मिळवून त्या विकल्याचे समोर येत असल्याचे सह आयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले.
क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने चेन्नई येथील कंझ्युमर कोर्टात दिलीप छाब्रिया यांच्याविरोधात धाव घेतली होती. दिनेश कार्तिकने डीसी अवंती कार बुक केली होती मात्र गाडीची डिलिव्हरी वेळेत मिळाली नाही आणि आगाऊ भरलेले पाच लाख रुपये सुद्धा परत मिळाले नाहीत. ज्यामुळे कार्तिकने कंझ्युमर कोर्टात धाव घेतली होती.





























































