संभाजी भिडेंच्या विधानावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजी भिडे गुरुजी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वडिलांबाबत वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली असून ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. काँग्रेसने त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. विधानसभेमध्येही याचे पडसाद उमटले. याबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले की, संभाजी भिडे गुरुजी यांनी जे वक्तव्य केलंय त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी या देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये एक महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा महानायकाबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणे पूर्णपणे अनुचित आहे. अशा प्रकारचे वक्तव्य भिडे गुरुजीच नाही तर कोणीच करू नये. याबाबत जी उचित कारवाई करायची असेल तरी राज्य सरकार करेल. महात्मा गांधी असो किंवा स्वातंत्र्यवीर सावकर असो कोणाच्याही विरुद्ध बोललेले खपवून घेतले जाणार नाही.

संभाजी भिडे यांचा भाजपशी संबंध नाही. ते त्यांच्या संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

काय म्हणाले होते भिडे गुरुजी?

मोहनदास म्हणजेच गांधीजी हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुसलमान जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे संतापलेल्या त्या जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले आणि त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे गांधीजींचे खरे वडील नसून ते त्या मुसलमान जमीनदाराचे पुत्र आहेत. गांधीजींचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुसलमान पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावा भिडे गुरुजी यांनी केला. अमरावतीमधील बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे आयोजित सभेमध्ये त्यांनी हे विधान केले.