डीसीपी सौरभ त्रिपाठींच्या नोकराला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंगडिया खंडणी प्रकरणात पाहिजे असलेला आरोपी डीसीपी सौरभ त्रिपाठींच्या नोकराला गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने (सीआययू)ने लखनौच्या गोमतीपूर येथून अटक केली. पप्पू प्यारेलाल गौड असे त्याचे नाव असून त्याने गेल्या काही महिन्यांत अंगडियाच्या पैशांचा व्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे.

क्राइम ब्रँचच्या सीआययूने अंगडिया खंडणी प्रकरणात तपास करून पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कदम आणि उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांना अटक केली होती. खंडणीच्या गुह्यात पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठीचे नाव समोर आले. त्रिपाठी यांचा शोध घेण्यासाठी क्राइम ब्रँचची पथके मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथे गेली आहेत. मात्र त्रिपाठी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. तपास सुरू असतानाच पोलिसांना त्रिपाठींचा नोकर पप्पूची माहिती मिळाली. त्याला पोलिसांनी लखनौच्या गोमतीनगर येथील घरातून अटक केली. पप्पू हा त्रिपाठीच्या घरी नोकर म्हणून काम करतो. मुंबईतून गोमतीनगर येथे जाणारी हवालाची रक्कम पप्पू हा घेत होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. पप्पूला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तरुणाच्या हत्येप्रकरणी सात जणांना अटक
दारूच्या पैशांतून तरुणाची हत्या झाल्याची घटना वर्सोवा येथे घडली होती. सूरज झांजोटिया असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी रवी सिंग, रोहित उघाडे, सोनू शेख, अब्बासुद्दीन शेख, मोहम्मद यदुल शेख आणि सफरुल शेखला अटक करून एका अल्पवयीन मुलाची रवानगी बालगृहात करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी सूरजचा रवीसोबत दारूवरून वाद झाला. त्यानंतर रवी आणि त्याच्या सहा साथीदारांनी सूरजला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सूरजचा मृत्यू झाला होता.