
सामना प्रतिनिधी । देवगड
देवगड तालुक्यातील शिरगाव बौद्धवाडी येथील एका युवकाचा मृतदेह बौद्धवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर आढळला. सचिन भिमसेन जाधव (वय-३४) असे त्याचे नाव आहे. सदर घटना सोमवार २१ जानेवारी दु. ३ वा. ते मंगळवारी २२ जानेवारी स. ९ वा. च्या दरम्यान घडली. याबाबत देवगड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
सचिन जाधव हा युवक काल दु.३ वा.च्या सुमारास शेवरे व्हाळीच्या ठिकाणी आंबा कलम बागेतील कामासाठी गेला होता. तो रात्री उशिरापर्यंत परत आला नाही म्हणून त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मंगळवारी सकाळी ९ वा.च्या सुमारास शेवरे हद्दीत बौद्धवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर तो मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती विशाल जाधव याने देवगड पोलीस ठाण्यात दिली असून याबत अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आत्माराम गोसावी करीत आहेत.































































