
राजेंद्र वाडेकर । राहुरी
राहुरीच्या मुळा धरणातील बॅकवॉटरच्या पाण्यात नगर येथील अशोक बोर्डे यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुळा धरणाजवळील सुरक्षेचा प्रश्न ऐऱणीवर आला आहे.
रविवारी सकाळी धरणातील पाण्यात मासेमारीसाठी गेलेल्या तरूणांना पाण्यात एका पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेची खबर मिळताच वरवंडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच अंकुश बर्डे राहुरी पोलीसांना या घटनेची खबर दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाय.एस.राक्षे, पोलीस कॉन्सटेबल नवनाथ वाघमोडे ,पोलीस नाईक अमित राठोड काॅन्सटेबल साईनाथ टेमकर यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्या मृत व्यक्तीच्या खिशात सापडलेल्या ओळख पत्रामुळे त्या व्यक्तीची ओळख पटली. मृत व्यक्तीचे नाव अशोक बोर्डे असून ते सारसनगर येथे राहणारे आहेत. मयत बोर्डे यांची एम.एच.१६ ए.बी.८०२१ ही मोटरसायकल व हेल्मेट घटनास्थळी पार्किंग केलेल्या अवस्थेत सापडली. राहुरी येथे शवविच्छेदनानंतर बोर्डे यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. २०१८ या संपूर्ण वर्षात मुळा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या पाच घटना घडल्याने या धरणाची सुरक्षितता रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
६ महिन्यापूर्वी धरणाच्या पाण्यात विषारी औषध टाकुन चोरीछुपे मासेमारी सुरू असलेल्या घटनेवर दै.सामनाने प्रकाशझोत टाकला होता. या वृत्ताची दखल घेऊन अवैध्य मासेमारी रोखण्यासाठी धरणाच्या परिसरात तात्पुरती सुरक्षा यंत्रना तैनात करण्यात आली होती. मात्र ठराविक कालावधीत पुन्हा धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न बेदखल झाला आहे. धरणाच्या लगत धाबे,हॉटेल तसेच रहिवाशांची वाढती अतिक्रमणे हे सुरक्षितता धोक्यात आणणारे ठरले असताना मात्र पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांनी या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. राहुरीच्या मुळा धरणावर नगर जिल्ह्यातील किमान २० लाख जनतेचा पाणी प्रश्न अवलंबून असल्याने धरणाच्या सुरक्षिततेची जबाबदारी अत्यावश्यक बनली आहे


























































