अॅण्टॉप हिलमध्ये मुंडके नसलेला, हात-पाय तोडलेला मृतदेह सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंडके नसलेला हात-पाय तोडून बांधलेल्या अवस्थेत एका 30 ते 35 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अॅण्टॉप हिल येथे सापडल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून अॅण्टॉप हिल पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

अॅण्टॉप हिल येथील सेक्टर-7 मध्ये 98 क्रमांक इमारतीच्या भिंतीला लागून झुडपाच्या आड मुंडके नसलेला मृतदेह सापडला. शिवाय तो मृतदेह जाळण्याचा प्रयत्नदेखील केला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी शीव रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. गंभीर म्हणजे मृतदेह सापडला तेथून हाकेच्या अंतरावर बाजूच्या इमारतीत सहाय्यक पोलीस आयुक्तांचे कार्यालय आहे. रात्री उशिरा अज्ञात आरोपीने मृत व्यक्तीची निर्घृण हत्या केली असणार. मग मृतदेह हात-पाय तोडून बांधलेल्या अवस्थेत तेथे आणून फेकला. शिवाय तेथेच मृतदेह जाळण्याचादेखील प्रयत्न करण्यात आला असा पोलिसांना संशय आहे.