
उत्तरप्रदेशात कोरोनाचा भयंकर कहर सुरू असून, उपचाराअभावी मोठय़ा संख्येने रुग्णांचा मृत्यू होत आहे. स्मशानभूमीत जागा नाही, लाकडांची टंचाई यामुळे अनेक मृतदेह गंगेच्या पाण्यात तरंगत असल्याचे विदारक दृष्य आहे. कानपूर, उन्नावमध्ये गंगाकिनारी हिंदू परंपरा बदलण्याची मजबुरी आली आहे. हजारो हिंदू मृतदेहांचे दफनविधी करावे लागत आहे. हे अत्यंत वेदनादायी चित्र पुढे आले आहे.
कोरोना महामारीत देशभर मृतांची संख्या वाढत असली तरी, उत्तर प्रदेशात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना प्रचंड यातनांना तोंड द्यावे लागत आहे. उपचाराअभावी, ऑक्सिजन टंचाईमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासन पूर्णपणे ठप्प झाल्याचे स्पष्ट होत आहे.
एप्रिल महिन्यात 5500 अंत्यविधी
लखनौ आणि कानपूर या दोन शहरांमध्ये एप्रिल महिन्यांत तब्बल 5500 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यात अनेक कोरोना रुग्णांचे मृतदेह होते. त्यासाठी तब्बल 25 हजार क्विंटल लाकडांची खरेदी प्रशासनाने केली. वाराणसीतही घाटांवर अंत्यसंस्कारासाठी जागा अपुरी पडत आहे.
सोमवारी बिहारच्या बक्सर येथील गंगा नदीच्या किनाऱयावर मृतदेह तरंगताना आढळले होते. आज उत्तरप्रदेशच्या गाझीपुर येथेही मृतदेह तरंगताना आढळले.
पाण्याची पातळी वाढल्यास मृतदेह वाहायला लागतील
कानपूर आणि उन्नावमध्ये गंगा नदीच्या किनाऱयावर काळजाचा थरकाप उडविणारे भयंकर वास्तव आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी लाकडं मिळत नाहीत. त्यामुळे हजारो हिंदू मृतदेहांवर दफनविधी करण्याची वेळ आली आहे. तीन फूट खोल खड्डे करून दफनविधी केले जात आहेत. पावसाळ्यात नेहमीच गंगेच्या पाणी पातळीत वाढ होते. सर्वच मृत कोरोनाचे नसले तरी दफनविधी केलेले अनेक मृतदेह कोरोना रुग्णांचे आहेत. पाणी पातळी वाढल्यास हे मृतदेह पाण्यात वाहायला लागतील. यामुळे कोरोना पसरण्याचा धोका आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला रूद्राभिषेक
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी गोरखनाथ मंदिर येथे महादेवाची पूजा केली आणि रुद्राभिषेक केला. वैदिक मंत्रोपच्चारात हा अभिषेक करण्यात आला. एक तास ही पूजा सुरू होती. कोरोनाचा विनाश होऊ दे असा संकल्प करून ही पूजा करण्यात आली.



























































