केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर, महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच आनंदाची बातमी मिळाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही वाढ 1 जुलै 2025 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्याच्या वाढीस मंजुरी देण्यात आली. वाढत्या महागाईला अनुसरून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे ही वाढ करण्यात आली आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना मूळ वेतनाच्या 55 टक्के महागाई भत्ता मिळतो. आता तो 58 टक्के होईल. नव्या निर्णयाचा लाभ केंद्र सरकारच्या 49.19 लाख विद्यमान कर्मचाऱ्यांना व 68.72 लाख पेन्शनधारकांना होणार आहे, तर केंद्र सरकारी तिजोरीवर 10,084 कोटींचा बोजा पडणार आहे.