कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे होणारे मृत्यूचे डेथ ऑडिट करण्यासाठी आज विभागीय स्तरावरील टास्क फोर्स समिती दाखल झाली. सीपीआर, जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेऊन कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यात आले असून, ही समिती राज्य सरकारकडे अहवाल सादर करणार आहे.
कोल्हापूर जिह्यात कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर आढळून येत असून, मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे डेथ ऑडिट करण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांना जिह्यामध्ये टास्क फोर्स पाठविण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज ही टास्क फोर्स ‘सीपीआर’ येथे दाखल झाली.
आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त या टास्क फोर्समध्ये बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. आरती किणीकर, नवले वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. डी. बी. कदम यांचा समावेश आहे. या समितीने ‘सीपीआर’ येथे बैठक घेऊन कोरोना रुग्णांसंबंधी माहिती जाणून घेतली. याशिवाय उपचार करणारे डॉक्टर्स, कर्मचाऱयांची संख्या, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन उपलब्धतेची माहिती जाणून घेतली. कोरोनाची लक्षणे असणारे अनेक रुग्ण होम क्वारंटाईन होऊन उपचार घेत असतात. मात्र, यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने अशा रुग्णांना होम क्वारंटाईन न करता कोविड केअर सेंटरमध्ये उपचार देण्याच्या सूचना या समितीने केल्या आहेत.
दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी कर्मचाऱयांची संख्या अपुरी असल्याचेही ‘सीपीआर’चे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी या समितीच्या निदर्शनास आणून दिले. सर्व माहितीचा अहवाल ही समिती राज्य सरकारकडे देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


































































