अल्पवीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा; गंगाखेड जिल्हा न्यायालयाचा निकाल

753

सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील एका सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या विष्णू मदन गोरे या आरोपीला गंगाखेड जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधीश एस.जी. इनामदार यांनी फाशीची शिक्षा सुनावली. बालवयातच माता-पित्यांचे छत्र हरविलेल्या नातीचा सांभाळ आजोबा करीत होते. सर्वांना तिचा लळा लागला होता. घरात सर्वांची ती आवडती होती.

27 आक्टोबर 2016 रोजी ती घराबाहेर खेळत आसताना अचानक बेपत्ता झाल्याने संपूर्ण कुंटुबाला धक्का बसला होता. तिच्या शोधासाठी शेळगाव पिंजून काढला रात्रभर तिचा शोध सुरू होता. मात्र, ती सापडली नाही. तिचे आजोबा प्रभाकर शामराव गायवळ यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात नातीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. सोनपेठ पोलिसानी तपास सुरू केला आसता या तपासात दोन दिवसात या बालिकेचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत विश्वाभंर लोढे यांचा शेतातील विहीरीत आढळून आला. या घटनेने संपूर्ण कुंटुबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी पोलिसांनी वैद्यकीय अहवालानुसार बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला.

पोलीस पाटील अश्रोबा कुराडे व सुनील गोरे यांनी या घटनेतील मुख्य आरोपी विष्णू मदन गोरे असल्याचे समजताच त्यांनी सोनपेठ पोलीस ठाण्याला याबाबत कळवले. मात्र, तोपर्यंत आरोपी गावातून फरार झाला होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने त्याला कर्नाटकातून अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्हाची कबुली दिली. गंगाखेड जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी आरोपपत्र दाखल करून या प्रकरणात एकूण 23 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, साक्षीदार व वैद्यकीय अहवाल घटनास्थळ तपास पोलीस अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध झाला यावरून न्यायधीश एस.जी.इनामदार यांनी आरोपी विष्णु गोरे याला फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड एस.डी. वाकोडकर यांनी कामकाज पाहिले. त्यांना अॅड डी.यु. दराडे, अॅड एस.बी. पौळ, अॅड एस.पी. चौधरी, अॅड भगवान यादव यांनी सहकार्य केले.

आपली प्रतिक्रिया द्या