
मुंबईच्या कुर्ला येथील नेहरूनगर परिसरात मंगळवारी पहाटे चार मजली इमारत कोसळली. या घटनेतील मृतांचा आकडा 14 वर पोहोचला आहे. ही इमारत कोसळल्यानंतर अग्निशामक दल व एनडीआरएफने तातडीने बचावकार्य सुरु केले.
महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 25 ते 30 जण अडकल्याची शक्यता आहे. यापैकी 15 जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आले असून इतर नागरिकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. दरम्यान राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहाटे घटनास्थळी भेट दिली व बचावकार्याचा आढावा घेतला.
कुर्ल्यातील ही इमारत पालिकेतर्फे धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती. तरी देखील अनेक रहिवासी या इमारतीत राहत होते. दरम्यान अग्निशामक दल व एनडीआरएफचे बचावकार्य सुरूच असून. अजूनही या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या बचावकार्याला संपूर्ण एक दिवस लागणार असल्याचे अग्निशामक दलाच्यावतीने सांगण्यात आले आहे.


























































