डेब्रिजच्या ढिगाऱयापासून बनणार विटा, रेती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत दररोज निर्माण होणाऱया 1200 मेट्रिक टन डेब्रिजपासून पालिका आता विटा, रेतीसह बांधकामासाठी उपयुक्त ठरणाऱया वस्तू बनवणार आहे. स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी पालिका लवकरच हा अभिनव उपक्रम राबवणार आहे. ‘डेब्रिज ऑन कॉल’ या उपक्रमामध्ये मुंबईत निर्माण होणाऱया डेब्रिजवर कंत्राटदाराच्या माध्यमातून प्रक्रिया केली जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.

मुंबईत सुरू असणारी बांधकामे आणि दुरुस्तीच्या कामांमुळे दररोज तब्बल 800 ते 1200 मेट्रिक टन डेब्रिज तयार होते. हे डेब्रिज बेकायदेशीरपणे वाट्टेल त्या ठिकाणी टाकण्यात येत असल्यामुळे अनेक ठिकाणी विद्रुपीकरण होते. मात्र पालिकेच्या माध्यमातून मुंबईच्या स्वच्छतेसाठी हे डेब्रिज कंत्राटदाराच्या माध्यमातून उचलून डंपिंग ग्राऊंडवर नेले जाते. मात्र यासाठी पालिकेला कंत्राटदारावर नाहक कोटय़वधी रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे डेब्रिजच्या विल्हेवाटीबाबत प्रशासन कोणता निर्णय घेणार असा सवाल मुंबईकर आणि नगरसेवकांकडून वारंवार उपस्थित केला जात होता.

या पार्श्वभूमीवर डेब्रिजपासून उपयोगी वस्तू बनवण्याचा उपक्रम राबवणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले. यामध्ये विटा, रेतीसह बांधकामांच्या पायासाठी भरणी तयार करण्यासारख्या उपयुक्त वस्तू बनवता येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी कंत्राटदाराला खासगी जागेवर प्रकल्प उभारावा लागणार आहे. कंत्राटदाराला आवश्यक असणारे डेब्रिज पालिकेच्या माध्यमातून ‘कॉल ऑन डेब्रिज’ उपक्रमातून देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय डेब्रिज निर्माण होणाऱया ठिकाणांहून डेब्रिज उचलण्याची व्यवस्थाही असेल.

आठवडाभरात निविदा काढणार

  • डेब्रिजच्या विल्हेवाटीसाठी पालिकेने याआधी 2018-19 च्या बजेटमध्ये 7 कोटी रुपयांची तरतूदही केली होती. मात्र पालिकेला काँट्रक्टर मिळालेला नाही. मुंबईत निर्माण होणाऱया डेब्रिजचे 1200 मेट्रिक टन हे प्रमाण मोठे असल्यानेच काँट्रक्टर मिळत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी पुन्हा आठवडाभरात निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
  • त्यामुळे आगामी प्रकल्पात एकत्र 1200 टन मेट्रिक टनांपर्यंतच्या प्रकल्पाचे काम न करता विभागणी करून छोटे प्रकल्प उभारण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला कंत्राटदार मिळून मुंबईतील डेब्रिजच्या ढिगांचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा पालिका प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.
  • डेब्रिजच्या विल्हेवाटीसाठी दिल्ली आणि ठाण्यात साठवणूक, प्रक्रिया आणि पुनर्वापराचा उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात येत आहेत. दिल्लीत हा प्रयोग 2009 पासून सुरू आहे. याच धर्तीवर मुंबईत डेब्रिजच्या विल्हेवाटीसाठी काम केले जाणार आहे. मुंबई महानगरपालिका यासाठी गेल्या दोन वर्षांपासून असा प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.