
सामना ऑनलाईन । पुणे
हिंदुस्थानातील पहिली सुपरफास्ट ट्रेन ‘डेक्कन क्वीन’ आज (शुक्रवार) ८८ वर्षांची झाली. या निमित्त पुण्यामध्ये एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केक कापून ‘डेक्कन क्वीन’चा वाढदिवस साजरा केला. या निमित्त ‘डेक्कन क्वीन’ची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच बँड पथकाने तिचे स्वागत करण्यात आले.
१ जून १९३० ला मुंबई आणि पुण्यादरम्यान ‘डेक्कन क्वीन’ ही सुपरफास्ट रेल्वेसेवा सुरू करण्यात आली होती. पहिल्यांदा ही रेल्वे सेवा आठवड्यातून फक्त एकदा सुरू होती. परंतु त्यानंतर प्रवाशांची वाढती संख्या पाहता ही रेल्वे सेवा दिवसातून एकदा करण्यात आली. ब्रिटीश काळात सुरू झालेली ही रेल्वे सेवा आजही अविरतपणे सुरू आहे.
पहिले काही वर्ष ‘डेक्कन क्वीन’ची सेवा फक्त ब्रिटीश नागरिकांसाठी होती. मुंबईमध्ये होणाऱ्या रेस कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी पुण्याहून ब्रिटीश येत असत. परंतु १९४३ मध्ये हिंदुस्थानी नागरिकांसाठीही या ट्रेनचे दरवाजे उघडण्यात आले. डेक्कन क्वीनला लोक प्रेमाने ‘दख्खनची राणी’ असेही म्हणतात.
‘डेक्कन क्वीन’चे वैशिष्ट्य –
> ही देशातील पहिली सुपरफास्ट रेल्वे आहे.
> लांबचा प्रवास करणारी ही पहिली रेल्वे होती आणि विशेष म्हणजे ही रेल्वे इलेक्ट्रॉनिक इंजीनवर चालते.
> महिलांसाठी स्पेशल कोच जोडणारी ‘डेक्कन क्वीन’ पहिली रेल्वे आहे.
> तसेच जेवणाची सुविधा पुरवणाऱ्या पहिल्या काही रेल्वेंमध्ये ‘डेक्कन क्वीन’चा समावेश आहे.
> ही रेल्वे सोमवार ते शुक्रवार पुणे जंक्शन ते सीएसएमटी दरम्यान आणि सीएसएमटी ते पुणे जंक्शनदरम्यान धावते.
> मुंबई ते पुणे हे अंतर १९१ कि.मी. असून मध्ये ५ स्टॉप असून या रेल्वेची प्रवासी क्षमता १४०० जणांची आहे.
> ही रेल्वे पुण्यातून ३ तास १५ मिनिटात पुणे ते मुंबई हे अंतर कापते. या रेल्वेचा वेग ६३ कि.मी. प्रतितास आहे.
> ‘डेक्कन क्वीन’ पुणे जंक्शनमधून सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुटते आणि सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचते.
> तर सीएसएमटीवरून सायंकाळी १७.१० (५ वाजून १० मिनिटांनी) सुटते आणि रात्री २०.२५ (८ वाजून २५ मिनिटांनी) पुणे जंक्शनला पोहोचते























































