डेक्कन क्वीनचे रुपडे पालटणार; विमानासारखी आसने, 24 डबे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई-पुणे धावणार्‍या ऐतिहासिक ‘डेक्कन क्वीन’चे मुंबई ते पुणे असा प्रवास करणार्‍यांच्या मनात रुतलेले पारंपरिक रूप कायम ठेवून तिला अत्याधुनिक ‘एलएचबी’ कोचची जोड देण्यात येणार आहे. तिची खासियत असलेली ‘डायनिंग कार’ आता एलएचबी तंत्रज्ञानाने तयार करण्यात यावी अशी मागणी रेल्वे बोर्डाकडे करण्यात आली आहे. तसेच या गाडीला एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी विमान प्रवासाप्रमाणे आसने असणारा ‘अनुभूती’ कोचही जोडण्यात येणार आहे. शिवाय ही गाडी आता 17 डब्यांऐवजी 24 डब्यांची करण्यात येणार आहे.

मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणार्‍या ऐतिहासिक डेक्कन क्वीनमध्ये काय बदल करावा यासाठी खास सर्वेक्षण करण्यात आले होते. यात गाडीच्या डायनिंग कारला हात लावू नका असे सर्व्हेत 80 टक्क्यांहून अधिक मुंबई व पुणे असा रोजचा प्रवास करणार्‍या प्रवाशांनी सांगितले होते. या गाडीची ओळख असलेला पारंपरिक निळा आणि पांढरा रंग, मध्ये लाल रंगाची पट्टी हा पॅटर्नही बदलू नका असा हट्टच ज्येष्ठ नागरिकांनी धरल्यामुळे आता करायचे काय असा प्रश्न मध्य रेल्वेसमोर होता.

दख्खनच्या राणीला 1 जूनचे बर्थ डे गिफ्ट

मध्य रेल्वेने जर्मनी तंत्रज्ञानाच्या ‘लिंके हॉफमन बुश’ अर्थात ‘एलएचबी’ डब्यांच्या डायनिंग कारसाठी रेल्वे बोर्डाला खास विनंती केली असून 1 जून रोजी दख्खनच्या राणीच्या 89 व्या वाढदिवसाला प्रवाशांना पारंपरिक रंग पण अत्याधुनिक डबे असे संमिश्र रूप प्रवाशांना पाहावयास मिळणार आहे.

दुहेरी सुविधा असणारी ‘डायनिंग कार’

डेक्कन क्वीनला रुळांवरील धावते उपाहारगृह (डायनिंग कार) असल्याने तिचे आधुनिकीकरण करताना अडचण येत होती. ‘डेक्कन क्वीन’मध्ये रुळांवरचे उपाहारगृह असले तरी ते इतर हिंदुस्थानी रेल्वेपेक्षा भिन्न आहे. याच एका ट्रेनमध्ये अर्ध्या भागात पॅण्ट्री आणि उर्वरित प्रवाशांना बसण्यासाठी उपाहारगृह अशी अनोखी दुहेरी सुविधा असणारी ‘डायनिंग कार’ आहे. त्यामुळे जर्मनी तंत्रज्ञानाच्या ‘लिंके हॉफमन बुश’ अर्थात ‘एलएचबी’ डब्यांची डायनिंग कार खास तयार करण्याची ऑर्डर देण्यात आली आहे.

आसनांना ‘लेगरेस्ट’ची सोय

17 डब्यांच्या डेक्कन क्वीनचे आयसीएफ कोच बदलून ‘एलएचबी’चे कोच बसविताना आसनांची संख्या कमी होण्याची शक्यता होती. म्हणून 17 डब्यांची ही ट्रेन आता 24 डब्यांची करण्यात येणार असून तिला एक्झिक्युटिव्ह क्लासचा ‘अनुभूती’ कोच जोडण्यात येणार आहे. ‘अनुभूती’च्या एका कोचमध्ये 56 आसने असून ती अत्यंत आरामदायी आहेत. ‘टू बाय टू’ अशी आसनांची रचना असून दोन आसनांमध्ये अंतरही अधिक ठेवल्याने पायाजवळ अधिक मोकळी जागा आहे. तसेच लांबचा प्रवास करताना पायांना आराम देण्यासाठी आसनांना ‘लेगरेस्ट’ची सोय देण्यात आली आहे. या आसनांना वेलवेट फिनिशिंग टच देण्यात आला आहे. याशिवाय एंटरटेन्मेंटसाठी आसनांना स्क्रीन लावलेले आहेत.