
लाडक्या बहिणीच्या नावावर मते मिळवून सत्तेत आल्यानंतर सरकारने ठाण्यात मात्र ‘लाडकी बहीण’ वाऱ्यावर सोडली आहे. काही वर्षांपूर्वी झाड पडून मृत्यू झालेल्या वकिलाच्या पत्नीला अद्याप न्याय मिळाला नाही. पीडित महिलेला ठाणे पालिकेत कायमस्वरूपी नोकरीचे स्वप्न दाखवण्यात आले होते. मात्र आठ वर्षांनंतरही पालिकेचा प्रस्ताव नगरविकास खात्याच्या टेबलावर धूळखात पडून असल्याने सर्वसामान्यांचे सरकार असल्याची टिमकी वाजवणाऱ्या ‘अनाथांच्या नाथा’ला आता तरी त्या लाडक्या बहिणीची आठवण येईल का, असा सवाल ठाणेकरांनी विचारला आहे.
ठाणे पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धर्मवीर मार्गावर 2017 मध्ये किशोर पवार या तरुण वकिलाचा अंगावर झाड पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूमुळे पालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. याप्रकरणी महासभेत वृक्ष प्राधिकरण विभागावर जोरदार टीका झाल्यानंतर पवार यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य देण्याच्या दृष्टिकोनातून महासभेत ठराव करण्यात आला. किशोर पवार यांची पत्नी प्रीती पवार यांना आस्थापनावरील विशेष बाब म्हणून लिपिक पदावर नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान हा ठराव नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आल्यानंतरही अध्याप कायमस्वरूपी नोकरी देण्यात आली नाही.
सध्या प्रीती पवार या कंत्राटी पद्धतीने काम करीत असून त्यांना ठेकेदाराकडून मानधन दिले जात आहे. कायम सेवेत घेण्यासाठी पाच वेळा प्रस्ताव पाठवला असूनसुद्धा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले आहे. शिंदे यांच्या निवासस्थानी चकरा मारून पवार कुटुंबीय थकले आहेत.