आणीबाणी अन् जनतेचा विरोध; टोकियो ऑलिम्पिक रद्द होण्याच्या मार्गावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोकियो ऑलिम्पिक रद्द होण्याच्या मार्गावर आहे. जपानमध्ये कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. तेथील काही शहरांमध्ये 31 मेपर्यंत आणीबाणीही लागू करण्यात आलेली आहे. ऑनलाइन याचिकेद्वारे दोन दिवसांमध्ये दोन लाख जनतेने या ऑलिम्पिकला कडाडून विरोध दर्शवला आहे. ही याचिका आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक, जपानचे पंतप्रधान योशिहिदो सुगा यांच्यासह ऑलिम्पिकशी जोडलेल्या इतर संस्था व पदाधिकाऱयांना पाठवण्यात आली आहे.

मेडिकल सुविधांचा अभाव

सध्या जपानमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे येथे मेडिकल सुविधांचाही अभाव दिसून येत आहे. अशा परिस्थितीत टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन केल्यास हेल्थ वर्कर, नागरिक व या क्रीडा महोत्सवाशी निगडीत जनतेसाठी हानिकारक ठरू शकते, असे याचिकाकर्त्याकडून स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

25 अरब डॉलर्सचे नुकसान

टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन 2020 साली होणार होते; पण कोरोनामुळे ते या वर्षी ढकलण्यात आले. पण जगभरातील विविध देशांमध्ये कोरोनाची लाट आलेली आहे. त्यामुळे हे ऑलिम्पिक रद्द होणार हे जवळपास निश्चित आहे. असे झाल्यास तब्बल 25 अरब डॉलर्सचे नुकसान होणार आहे. तसेच याआधी बर्लिन (1916), टोकियो (1940) व लंडन (1944) येथील ऑलिम्पिक रद्द करण्यात आले होते.

थॉमस बाक पंतप्रधानांना भेटणार

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक हे जपानचे पंतप्रधान योशिहिदो सुगा यांना भेटणार आहेत. 17 मे रोजी टोकियो ऑलिम्पिक टॉर्च रिले इव्हेण्ट आहे. यानंतर दोघांची भेट होणार आहे. यामध्ये ऑलिम्पिकबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे.