
सामना ऑनलाईन, मुंबई
पाणबुडी अपघात किंवा अन्य आणीबाणीच्या वेळी पाणबुडीतून नौसैनिकांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक असणारे पहिले ‘डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हिहिंकल’ (डीएसआरव्ही) आज नौदलात दाखल झाले. मुंबईतील कार्यक्रमात नौदल प्रमुख सुनील लांबा यांच्या हस्ते ‘डीएसआरव्ही’चे जलावतरण करण्यात आले. पश्चिम नौदल क्षेत्रासाठी हे बचाव वाहन असून दक्षिणेकडील विशाखापट्टनम येथील नौदलाच्या तळावर लवकरच ‘डीएसआरव्ही’ तैनात करण्यात येणार आहे.
मुंबईत काही वर्षांपूर्वी पाणबुडी अपघातात अनेक नौसैनिकांना आपला प्राण गमवाला लागला होता. त्यावरून सर्वत्र क्षेत्रातून सरकारवर टीका झाली होती. त्यामुळे नौदलाचे आधुनिकीकरण करताना पाणबुडय़ांच्या दुर्घटना किंवा आणीबाणीच्यावेळी सैनिकांना वाचवण्याची यंत्रणा यावर भर देण्यावर नौदलाने भर दिला होता. 15 ऑक्टोबर 2018 मध्ये याची पहिली चाचणी घेतल्यानंतर आज ‘डीएसआरव्ही’ नौदलात दाखल करण्यात आले.
हिंदुस्थानी नौदलात ‘डीएसआरव्ही’ दाखल होणे ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे बचाव वाहन नौदलाला मिळावे, यासाठी नौदलाचे प्रयत्न सुरू होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘डीएसआरव्ही’ यंत्रणा असणारे हिंदुस्थानी नौदल हे सहावे नौदल बनले आहे- सुनील लांबा, नौदलप्रमुख
‘डीएसआरव्ही’ची वैशिष्टय़े
- 300 सागरी फुट खाली जाऊन बचावकार्य करण्याची क्षमता.
- एकाच वेळी 14 नौसैनिकांना वाचवण्याची क्षमता.
- स्कॉटलंड येथील जेएफडी कंपनीकडून दोन अत्याधुनिक ‘डीएसआरव्ही’ आयात (थर्ड जनरेशन प्रोडक्ट).
- दोघांची किंमत सुमारे 193 मिलियन पाऊंड आहे.
- मुंबईतील ‘आयएनएस साबरमती’वर हे वाहन तैनात करण्यात आले आहे.



























































