
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आत्मसन्मानाने मृत्यू स्वीकारणे म्हणजे स्वेच्छामरण असल्याचे मत माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी व्यक्त केले. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केले. पेला अर्धा भरला आहे, असेच मी नेहमी म्हणतो. पेला अर्धा रिकामा आहे, असा दृष्टिकोन आपला नसल्याचेही त्यांनी सांगितले. जीवनाकडे आशावादी दृष्टिकोनातून बघितले पाहिजे, असेही ते म्हणाले. या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात आत्मसन्मान, जीवन आणि स्वेच्छा मृत्युबाबत चर्चा करण्यात आली.
स्वेच्छामरणाबाबतची संकल्पना समजवण्यासाठी त्यांनी महाभारत काळातील दाखला दिला. भीष्म पितामह यांना स्वेच्छामरण हवे होते. सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यावरच त्यांना मरण हवे होते. त्यांना श्रीकृष्ण आणि अजुर्नाला काही गोष्टी सांगायच्या होत्या. आपल्याला काही जबाबदाऱ्या अजूनही पूर्ण करायच्या आहेत, याची जाणीव त्यांना होती. शरीरात चैतन्य असताना मरण यावे अशी त्यांची इच्छा होती. दधीची ऋषींनीही इंद्राचे वज्र बनवण्यासाठी स्वतःच्या अस्थी दान केल्या होत्या. ती आत्महत्या नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. समाजासाठी महत्त्वाची योगदान देण्याची दधीची ऋषींची इच्छा होती. कोणाचाही आत्मसन्मानाला मृत्युच्या वेळी ठेस पोहचता काम नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
पृथ्वीवर जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे. मृत्यूनंतर शरीराचा अंत होतो. मात्र, आत्मा अमर आहे. शरीराचे दहन, दफन किंवा अंत्यसंस्कार करून शरीर नष्ट केले जाते. मात्र, आत्मा अमर आहे. जीव आणि आत्मा एकमेकांशी जोडलेले आहेत. ‘प्रूफ ऑफ हेवन’ हे एका न्यूरोलॉजिस्टचे पुस्तक आपण वाचले आहे. त्यात मृत्युचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या पुस्तकात पुनर्जन्माबाबतचे दाखले लेखकाने दिले आहेत. त्यामुळे मृत्यू म्हणजे अंत नसून फक्त शरीर बदलणे असा त्याचा अर्थ आहे, असे मिश्रा म्हणाले.
जीवन आणि मृत्यू या दोन गोष्टी आहेत. जीवन प्रत्येक क्षणी तुम्हाला खिजवत असते. जीवनात प्रत्येक क्षणी व्यक्ती स्वतःच्या विवंचनेत मरणाचा अनुभव घेत असतो, असे धर्मराज युधिष्ठीराने म्हटल्याचेही मिश्रा म्हणाले. आपण अनंतकाळपर्यंत पृथ्वीवर वावरणार आहोत, अशी प्रत्येकाची समजूत असते. या भावेतूनच मृत्युबाबतची भीती निर्माण होते. मात्र, मृत्युला घाबरण्याचे कारण नसून आशावादी दृष्टिकोनातून बघायला हवे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.




























































