दीपिका पदुकोन एनसीबीच्या रडारवर

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणाने नवे वळण घेतले असून बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर येत आहे. या प्रकरणात आता बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे नाव आले आहे. दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि क्वान टॅलेंट मॅनेजमेंट एजेन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर यांना एनसीबीने समन्स बजावले आहे. एनसीबीच्या तपासात दीपिका आणि करिश्मा यांच्यामधील ड्रग्ज चॅट उघड झाल्याचे समजते. त्यामुळे दीपिकाच्या अडचणी वाढल्या असून तिचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

सध्या एनसीबीची टीम सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदी आणि टॅलेंट मॅनेजर जया साहा यांची चौकशी करत आहे. जयाच्या चॅटमधून काही बॉलीवूड सेलिब्रेटींची नावे उघड झाली आहेत. दीपिकाची मॅनेजर करिश्मा आणि जया यांच्यात ड्रग्जविषयी बोलणं झाल्याचं चॅटमधून उघड झाले आहे. या चॅटमध्ये दीपिका करिश्माकडे ड्रग्जची मागणी करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या चॅटमध्ये ‘डी’ आणि ‘के’ अक्षरांचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय अन्य दोन जणांची नावंही त्या घेताना दिसतात.

रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या अटकेनंतर एनसीबीने अन्य लोकांचीही चौकशी करण्याची तयारी केली आहे. बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका व्यतिरिक्त सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांची नावेही समोर आल्याचे समजते.

तुझ्याकडे माल आहे का?
एनसीबीच्या तपासात जया सहाने करिश्मा आणि दीपिका यांच्यामध्ये काय चर्चा झाली ते सांगितले. यामध्ये म्हटलंय, ‘डी’ ‘के’ला विचारतेय, तुझ्याकडे माल आहे का? यावर ‘के’ उत्तर देत म्हणते की, हो पण घरी आहे, मी बांद्रय़ाला आहे. यावर ‘के’ अमित नावाच्या व्यक्तीचे नाव घेऊन सांगते की, मी अमितकडे पाठवू शकते. यावर ‘डी’ म्हणते हो प्लीज. थोडय़ावेळाने ‘के’ म्हणते अमित घेऊन जात आहे. यावर ‘डी’ म्हणते हॅश आहे ना? तर ‘के’ म्हणते हॅश नाही गांजा आहे. यातील डी म्हणजे दीपिका आणि के म्हणजे करिश्मा असल्याचे समजते.

रिया चक्रवर्तीचा कोठडीतील मुक्काम वाढला
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या न्यायालयीन कोठडीत विशेष न्यायालयाने 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, रिया व तिचा भाऊ शोविकने जामिनासाठी उच्च न्यायालयात केलेल्या अर्जावर उद्या बुधवारी सुनावणी होणार आहे.

आपल्याला या प्रकरणात फसवण्यात आले असून आपण निर्देष असल्याचा दावा रियाने याचिकेत केला आहे. या प्रकरणात रिया, शोविकसोबत सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत आदींना ताब्यात घेण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या