भक्तिमार्गावरील दीपस्तंभ- दीपमाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशुतोष बापट

महाराष्ट्रात गावोगावी आपल्याला दीपमाळा बघायला मिळतात. काही साध्या असतात तर काही वैशिष्टय़पूर्ण असतात. आपण याआधीही पाहिले आहे की दीपमाळा या समृद्धी, ऐश्वर्य, संपन्नता यांचे प्रतीक आहेत. भक्तिमार्गावरील वाटसरूला उजेड दाखवण्याचे कार्य त्या करीत असतात. आज लक्ष्मीपूजनाचा दिवस. लक्ष्मी म्हणजे समृद्धी, ऐश्वर्य आणि पराक्रमाचे प्रतीक. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले हे दीपमाळांचे स्थापत्य याच तीन गुणांची आपल्याला आठवण करून देते ना? आपला तेजस्वी वारसा आज आपल्यासमोर दीपमाळांच्या रूपाने उभा आहे. त्या दीपमाळांचे अंतरंग जाणून घेणे, त्या भव्यदिव्य वारशाची जपणूक करणे आणि त्याचे मनसोक्त दर्शन घेणे म्हणजेच आपल्या संस्कृतीच्या समृद्ध, संपन्न ऐश्वर्याचे पूजन नव्हे काय?

आपल्या महाराष्ट्रात विविध मंदिरांच्या प्रांगणात मोठय़ा दिमाखात उभ्या असलेल्या दीपमाळा त्या त्या मंदिराच्या सौंदर्यात मोठी भर घालत आहेत. मंदिराचे पावित्र्य, तिथे अनुभवायला मिळणारी शांतता या सगळ्याला तिथे असणाऱया दीपमाळासुद्धा तेवढय़ाच कारणीभूत आहेत. महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक गावी मंदिरासमोर दीपमाळ असतेच. दीपमाळ ही जशी तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा मार्ग दाखवते तशीच ती भक्तिमार्गावर चालणाऱया वाटसरूला दिशा दाखवण्याचे कामसुद्धा करीत आलेली आहे. चासच्या मंदिरात असलेली भव्य दीपमाळ आणि तिथे होणारा उत्सव हा जसा वैशिष्टय़पूर्ण आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात इतर ठिकाणी पण काहीशा निराळ्या आणि वेगळे वैशिष्टय़े असलेल्या दीपमाळा पाहायला मिळतात.

तर अशीच एक काहीशी निराळी दीपमाळ आहे ती नगर जिह्यातल्या कर्जत तालुक्यातील राशीन या गावातल्या भवानी किंवा जगदंबा मंदिरातली. राशीन हे पेशवाईतील मुत्सद्दी अंताजी माणकेश्वरांचे गाव. मंदिरातल्या एका ओवरीमधील एक संस्कृत आणि एका मराठी शिलालेखात त्यांच्या नावाचा उल्लेख आहे. इथे एकूण पाच शिलालेख आहेत. इथे अत्यंत डौलदार अशा दोन दीपमाळा आहेत. यांचे वैशिष्टय़ म्हणजे या चक्क हलतात. त्यांचे बांधकाम खाली दगडाचे आणि वर विटांचे आहे. वर जाण्यासाठी बाहेरून आणि आतून जिने केलेले आहेत. जिन्यावरून वर गेल्यावर एक लाकडी दांडा आडवा बसवलेला आहे. तो धरून हलवला की दीपमाळ हलते. हा चमत्कार आश्चर्यकारक नक्कीच आहे, पण हा दैवी चमत्कार नसून स्थापत्यशास्त्राची करामत आहे. तत्कालीन स्थपतींनी विशिष्ट तंत्रज्ञान वापरून अशा पद्धतीने या दीपमाळा उभारल्या की त्या हलणाऱया-डोलणाऱया झालेल्या आहेत. बीड जिह्यातील रेणापूर, शिरूरजवळील कर्डे इथल्या मंदिरातसुद्धा अशाच डोलणाऱया दीपमाळा आहेत. जळगावजवळ असलेल्या फरकांडे गावच्या मंदिरात असलेले मनोरेसुद्धा असेच हलायचे. दुर्दैवाने त्यातल्या एक मनोरा आता ढासळला आहे.

दीपमाळा उभारताना त्यावर भौगोलिक स्थितीचा प्रभाव मोठा पडलेला दिसतो. कोकणातल्या दीपमाळा या चिरे वापरून केलेल्या आढळतात. त्यावर वेगळे हात काढले नसून बांधतानाच ठरावीक उंचीवर चौकोनी चिरे काहीसे बाहेर काढून दिवे लावायची सोय केलेली असते. राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे या गावी असलेल्या भार्गवराम मंदिरातील दीपमाळ अशीच पाहण्याजोगी आहे. इथे ही दीपमाळ खूपच वेगळ्या पद्धतीने बांधलेली आहे. आधी चौकोनी मग वर काहीशी गोल अशा पद्धतीची ही दीपमाळ आहे. सर्वात वर कमळाच्या आकाराचा खोलगट दगड असून त्यात त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरी वाट पाजळली जाते. देवाचे गोठणे हे गाव थोरले बाजीराव पेशवे यांनी त्यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांना इनाम म्हणून दिलेले होते. कोकणातच विजयदुर्गजवळील गिर्ये गावात असलेल्या रामेश्वर मंदिरातली दीपमाळा किंवा मिठगव्हाणे या गावचे दैवत असलेल्या अंजनेश्वर मंदिरातील दीपमाळा यासुद्धा अगदी देखण्या दीपमाळा आहेत. इथे या संख्येने जास्त आहेत. ज्याप्रमाणे कोकणात आपल्याला निराळ्या दीपमाळा दिसतात तशाच गोव्यातही काहीशा वेगळ्या दीपमाळा पाहायला मिळतात. गोव्यात मंगेशीच्या देवळात असलेली दीपमाळ ही उंच आणि भव्य अशी दिसते. तसेच नार्वे इथे असलेल्या सप्तकोटीश्वर मंदिरासमोर असलेली दीपमाळ हीदेखील काहीशी वेगळ्या धाटणीची दिसते.

पुणे जिह्यात असलेले लोणी भापकर हे गाव तिथे असलेल्या मंदिरामुळे आणि त्यासमोर असलेल्या यज्ञवराहाच्या मूर्तीमुळे प्रसिद्ध झालेले आहे. याच गावात असलेल्या काळभैरवाच्या मंदिरात उंच आणि देखण्या अशा दोन दीपमाळा आहेत. काळ्या दगडातून घडवलेल्या या दीपमाळांवर त्रिपुरारी पौर्णिमेला दिवे लावतात. याच मंदिराच्या प्रांगणात वसई विजयाचे प्रतीक असलेली पोर्तुगीज घंटा पाहायला मिळते. सातारा जिह्यात अंगापूर नावाचे गाव आहे. समर्थ रामदास स्वामींना याच अंगापूरला कृष्णा नदीच्या डोहात राममूर्ती सापडली होती. ती त्यांनी चाफळ इथल्या मंदिरात प्रस्थापित केली. या अंगापूरला एक गणपतीचे मंदिर आहे. या मंदिराच्या प्रांगणात असलेली दीपमाळ फारच देखणी आहे. एका चौथऱयावर उभी असलेली ही डौलदार दीपमाळ आपले लक्ष वेधून घेते. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातली, शिखर शिंगणापूरच्या महादेव मंदिरातली किंवा वाई इथल्या काशीविश्वेश्वर मंदिरातली दीपमाळ या खूप उंच, देखण्या आणि डौलदार दीपमाळा आहेत.

सर्वसाधारणपणे दगडात बांधलेल्या दीपमाळा सगळीकडे दिसत असताना पुढे पेशवे काळात दगडी दीपमाळांच्या बरोबरीने विटांनी बांधलेल्या दीपमाळासुद्धा दिसून येतात. जेजुरीजवळ असलेल्या पांडेश्वर इथल्या मंदिरासमोर असलेल्या दीपमाळा विटांनी बांधलेल्या आहेत. यांची रचना अगदी मिनारांसारखी दिसते. आतून पोकळ असलेल्या या दीपमाळेमधून वर जाण्यासाठी जिना आहे. ज्याप्रमाणे मंदिर उभारणी करणे किंवा त्यासाठी दान देणे हे जसे पुण्याचे कार्य समजले जाते त्याचप्रमाणे मंदिरांसमोर दीपमाळा उभारणे हेदेखील पुण्यकृत्य समजले गेले आहे. त्यामुळे त्या उद्देशाने किंवा काही लोक नवस फेडण्यासाठीसुद्धा देवळात दीपमाळा उभारतात.

दीपमाळांची ही काही प्रातिनिधिक उदाहरणे झाली. महाराष्ट्रात गावोगावी आपल्याला दीपमाळा बघायला मिळतात. काही साध्या असतात तर काही वैशिष्टय़पूर्ण असतात. आपण याआधीही पाहिले आहे की दीपमाळा या समृद्धी, ऐश्वर्य, संपन्नता यांचे प्रतीक आहेत. भक्तिमार्गावरील वाटसरूला उजेड दाखवण्याचे कार्य त्या करीत असतात. आज लक्ष्मीपूजनाचा दिवस. लक्ष्मी म्हणजे समृद्धी, ऐश्वर्य आणि पराक्रमाचे प्रतीक. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले हे दीपमाळांचे स्थापत्य याच तीन गुणांची आपल्याला आठवण करून देते ना? आपला तेजस्वी वारसा आज आपल्यासमोर दीपमाळांच्या रूपाने उभा आहे. त्या दीपमाळांचे अंतरंग जाणून घेणे, त्या भव्यदिव्य वारशाची जपणूक करणे आणि त्याचे मनसोक्त दर्शन घेणे म्हणजेच आपल्या संस्कृतीच्या समृद्ध, संपन्न ऐश्वर्याचे पूजन नव्हे काय? आपला वारसा हीच आपली लक्ष्मी. त्याचे जतन, संवर्धन आणि त्याची जगाला ओळख करून देणे हेच खरे लक्ष्मीपूजन होय.

[email protected]