देशातील हुकूमशाही प्रवृत्तीला पराभूत करा ‘निर्भय बनो’ सभेत निखिल वागळे यांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी लोकशाही धोक्यात आणली आहे. अघोषित आणीबाणी लादून हुकूमशाही सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत या प्रवृत्तींचा पराभव करून त्यांना धडा शिकवा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले.

सिन्नर येथे शनिवारी रात्री ‘निर्भय बनो’ सभेत निखिल वागळे बोलत होते. ही सभा उधळवून लावण्याचा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी भाजपा समर्थकांनी व्हायरल केला होता, हे सांगून ते म्हणाले, कुणाच्या धमक्यांना ही जनता आणि आम्ही घाबरणार नाही. कोणते हात केव्हा अन् कसे रोखायचे हे आम्हालाही माहिती आहे, असे आव्हानच त्यांनी दिले.

श्रीराम ही भाजपची खासगी मालमत्ता नव्हे
प्रभू श्रीराम हे सत्यवचनी होते. भाजपचा एकही नेता खरे बोलत नाही. श्रीराम ही भाजपाची खासगी मालमत्ता नाही. अयोध्येतील श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला, संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना का बोलविण्यात आले नव्हते, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत विश्वंभर चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

मोठे भ्रष्टाचारी हे भाजपात
आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिमा मलीन केली, लोकशाही पायदळी तुडविली. देशात न्यायव्यवस्थेचा उघड उघड अवमान सुरू आहे. काँग्रेसमुक्त भारत ही भाजपाची हिंसक घोषणा आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत ही फसवी घोषणा असून, सर्वात मोठे भ्रष्टाचारी हे भाजपात आहेत. सूडाच्या राजकारणासाठी ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, असे टीकास्त्र अॅड. असीम सरोदे यांनी सोडले.