
हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि संरक्षण दल यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि काय खबरदारी घ्यायची याबरोबरच संरक्षण दलांना राज्य सरकारतर्फे अपेक्षित सहकार्य आणि अधिक गतीची समन्वय यंत्रणा उभारण्यावर या बैठकीत चर्चा झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी ही बैठक झाली. मुंबई ही देशाची राजधानी आहे. यापूर्वी मुंबईवर हल्ले झाले तेव्हा शत्रूकडून हिंदुस्थानच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला असे दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे भविष्यात सरकार आणि संरक्षण दलाने समन्वयाने काम करावे लागेल. त्यासाठी गुप्तचर माहितीचे आदानप्रदान महत्त्वाचे आहे आणि सायबर सुरक्षेबाबतही काळजी घ्यावी लागेल असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिव सुजाता सौनिक, लष्कराचे लेफ्टनंट जनरल पवन चढ्ढा, कर्नल संदीप सील, नौदलाचे रिअर अॅडमिरल अनिल जग्गी, कमांडर नितेश गर्ग, हवाई दलाचे वाईस एअर मार्शल रजत मोहन आदी उपस्थित होते. रिझर्व्ह बँक, जेएनपीटी, बीपीटी, मुंबई स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, एटीएस, होमगार्ड यांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.