टास्क पूर्ण करण्यासाठी लहान मुलाने महिलेला भोसकलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डेहरादूनमध्ये एका बारा वर्षाच्या विद्यार्थ्याने एका महिलेवर चाकूहल्ला केला आहे. हा हल्ला केल्यानंतर तो बेपत्ता झाला आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता एका ऑनलाईन पोर्टलवर त्याला अनोळखी व्यक्तीने टास्क दिल्याचं दिसून आलं. त्यामुळे हे जीवघेणे खेळ पुन्हा डोकं वर काढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे

मोबाईलचे खेळ मुलांसाठी जीवघेणे ठरत आहेत. ब्ल्यू व्हेल, मोमो चॅलेन्ज, पब्जी यासारख्या खेळांनी मुलांची मानसिकता हिंसक झाली होती. यामुळे या गेमवर बंदी घालण्यात आली होती. मात्र डेहरादूनमध्ये पटेल नगरात राहणाऱ्या एका शाळकरी मुलाने सोमवारी संध्याकाळी एका महिलेवर चाकूहल्ला केला. ही महिला नेहरु कॉलनीजवळ राहाते.  मुलाच्या चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्ला करणारा मुलगा बेपत्ता झाला असून त्याच्या पालकांनी पोलीस स्थानकात मुलगा हरवल्याची तक्रार केली आहे.

या मुलाने मोबाईल फोन घरीच ठेवला होता. बुधवारी पोलिसांनी त्याच्या फोनची चाचपणी केली असता त्याच्या मोबाईलमधल्या काही गोष्टी पाहून पोलिसांना धक्काच बसला. तो डिस्कॉर्ड या ऑनलाईन चॅटिंग पोर्टलवर एका अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग करत होता. या पोर्टलवरुन त्याला एका व्यक्तीवर हल्ला करण्याचा टास्क देण्यात आला होता. यामध्ये To kill someone, to suicide or to disappear.”असे लिहीले होते.