छप्परफाड विकास; मुसळधार पावसात पुन्हा दिल्ली विमानतळाचे छत कोसळले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 1 चे छत मुसळधार पावसामुळे ढासळले होते. त्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा त्याचठिकाणी दुर्घटना घडली. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे यांमुळे येथील छत कोसळले. त्यामुळे दिल्ली विमानतळाचा छप्परफाड विकास समोर आला असून मोदी सरकारच्या कार्यकाळातील कामांचा दर्जा आणि त्यातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे. छत कोसळल्याच्या घटनेचा व्हिडीओ काँग्रेसने ‘एक्स’वरून शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल झाला आहे.

मुसळधार पावसामुळे आज सकाळी टर्मिनल-1 च्या बाहेर उभारण्यात आलेले छत कोसळले. त्यानंतर दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडची प्रचंड तारांबळ उडाली आणि त्यांनी प्रवाशांना शांत करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. प्रवाशांनी चिंता करू नये, आपल्या विमान उड्डाणाचे सध्याचे स्टेटस काय आहे हे जाणून घेण्यासाठी थेट दिल्ली विमानतळ प्राधिकरणाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. शनिवारपासून दिल्लीत मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे विमानतळ परिसरातही पाणी साचले.

विमानतळ प्राधिकरण काय म्हणाले…

छत कोसळल्याच्या घटनेनंतर विमानतळ प्राधिकरणाने आपली चूक मानन्याऐवजी आपली बाजू मांडली. 24 मेच्या रात्री मुसळधार पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे टर्मिनल 1 च्या एण्ट्री पॉइंटवरही पाणी साचले. पाणी आणि वारा यांच्या दबावामुळे बाहेरील भागात लावण्यात आलेले टेंशन फॅब्रिकवर पाणी साठल्यामुळे त्याचा भार वाढून छत कोसळले असे दिल्ली विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे.

संपूर्ण शहर पाण्याखाली

वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे संपूर्ण दिल्ली शहर पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. मिंटो रोड, आयटीओ, लक्ष्मी नगर, मायापुरीसह सर्व परिसरात पाणी भरले आहे. रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले असून वाहने पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे. शनिवारी रात्री साडेअकरापासून आज पहाटे साडेपाच वाजेपर्यंत दिल्लीत तब्बल 81.2 मिमी पाऊस आणि प्रति तास 82 किलोमीटर वेगाने वारे वाहिले. त्यामुळे आज दिवसभरात तब्बल 49 विमान उड्डाणे इतरत्र वळवावी लागली.