दिल्लीच्या शाळेत बॉम्ब असल्याचा ईमेल, परिसरात उडाला एकच गोंधळ

दिल्लीतील साकेत येथील अमिटी इंटरनॅशनल स्कूलला सोमवारी ई-मेलद्वारे बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली आहे. या ईमेलने एकच खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने शाळेला ई-मेल करून बॉम्ब असल्याची धमकी दिली. या घटनेनंतर बॉम्बशोधक पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

एमिटी इंटरनॅशनल शाळेच्या इमेलवर साधारण सकाळी 9च्या सुमारास एक मेल आला. ज्यामध्ये 13 फेब्रुवारीला शाळेत बॉम्बस्फोट होईल अशी धमकी दिली आहे. शिवाय त्यात पैशांची मागणीही केली आहे. या घटनेने शाळा प्रशासनाचा थरकाप उडाला. शाळेने तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शाळा रिकामी केली. त्यानंतर संपूर्ण शाळेची कसून तपासणी करण्यात आली. मात्र परंतु अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही. पोलिसांचे पथक अजूनही घटनास्थळी आहे. आता हा इमेल नेमका कुणी केला आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

दक्षिण दिल्लीतील डीपीएस आरके पुरम यांना ईमेलद्वारे अशाच प्रकारची बॉम्बची धमकी देण्यात आली होती. पोलीस आणि SWAT पथकांनी कसून शोध घेतल्यानंतरही काहीही सापडले नाही. दक्षिण दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बची धमकी देणारे ईमेल प्राप्त झाले आहेत.