
दिल्ली आणि आसपासच्या शहरांसह उत्तर हिंदुस्थानातील अनेक भागांत सोमवारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. दिल्लीसह नोएडा आणि गाझियाबाद येथे भूकंपाचे धक्के बसले.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली आहे. त्यानुसार, नेपाळमध्ये 10 किमी आत या भूकंपाचे केंद्र असल्याचं दिसून आलं आहे आणि हे धक्के भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 4.16 वाजता बसले. गेल्या तीन दिवसांत तिसऱ्यांदा आणि गेल्या महिन्यातला हा पाचवा धक्का आहे.
भूकंपाच्या जाणिवेने सामान्य नागरिकांमध्ये घबराट पसरली. दिल्ली आणि परिसरातल्या अनेक घरांतील वस्तू आणि फर्निचर जोरजोरात हलू लागले. अनेक लोक भीतीने घराबाहेर पडले. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
























































