
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या तब्येतीत कुठलीच सुधारणा झाली नसून त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. रविवारी सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेटली यांची एम्स रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना भेटण्यासाठी राजकीय मंडळींनी एम्स रुग्णालयात गर्दी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील शुक्रवारी रात्री रुग्णालयात जाऊन जेटली यांची विचारपूस केली.
जेटली यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाला असून गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 9 ऑगस्टला त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. पण त्यांच्या तब्येतीत चढ उतार होत असल्याने डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. शुक्रवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही जेटली यांना भेटण्यास गेले होते. तर रात्री 12 च्या सुमारास अमित शहा यांनी रुग्णालयात जाऊन जेटली यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी जेटली यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.





























































