
‘रोड शो’ला उसळलेल्या प्रचंड गर्दीमुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. मंगळवारी केजरीवाल सरकारी कार्यालयात पोहोचले. पण, तेथेही अपक्षांची गर्दी. तब्बल सात तासांच्या वेटिंगनंतर केजरीवाल यांना अर्ज दाखल करता आला. यामागे भाजपचे षड्यंत्र आहे. केजरीवाल यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून रोखण्याचा भाजपचा हा प्रयत्न होता, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आज मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पण, अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठे नाटय़ रंगलेले पाहायला मिळाले.
टोकन क्रमांक 45
- ‘रोड शो’च्या गर्दीमुळे मुख्यमंत्री केजरीवाल जामनगर हाऊस केंद्रावर काल अर्ज दाखल करण्यास पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी आज अर्ज भरला.
- दुपारी 12 वाजता केजरीवाल जामनगर हाऊस केंद्रावर पोहोचले तर अपक्षांची आधीच मोठी गर्दी होती. केजरीवाल यांना 45 क्रमांकाचे टोकन देण्यात आले. मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल यांना सवलत देऊन आधी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अपक्ष उमेदवारांनी विरोध केला. सरकारी कार्यालयात नारेबाजी केली. त्यामुळे सरकारी अधिकाऱयांनी टोकन क्रमांकानुसार अर्ज दाखल करून घेतले.
- केजरीवाल खरंच अर्ज दाखल करू शकतील का? अशी शंका उपस्थित होत होती. अखेर सात तासांच्या प्रतीक्षेनंतर केजरीवाल यांनी उमेदवारी अर्ज भरला.
- केजरीवाल यांना उमेदवारी अर्जच दाखल करता येऊ नये, असे भाजपचे षड्यंत्र होते. त्यासाठी मोठय़ा संख्येने अपक्ष उमेदवार उभे केले गेले. – मनीष सिसोदिया, (उपमुख्यमंत्री, दिल्ली)





























































